"योग्य ठिकाणी थांबता आलं पाहिजे"
"योग्य ठिकाणी थांबता आलं पाहिजे"
✍️ ललित लेख
जग आपल्याला नेहमी सांगतं – "चालत राहा", "पुढे जा", "थांबू नका". यशाच्या झगमगाटामध्ये धावत राहणं, हेच आयुष्याचं अंतिम सत्य असल्यासारखं आपल्या नकळत मनावर बिंबतं. पण… थांबणं देखील एक कलेची, जाणिवेची आणि शहाणपणाची गोष्ट आहे. चालणं जसं आवश्यक आहे, तसं थांबणंही तितकंच आवश्यक आहे… आणि अधिक अर्थपूर्णदेखील.
लहानपणी पुस्तकांच्या प्रेमात पडायचो. एक वाचता वाचता दुसरं, त्यातच एखादं गवसलेलं मनात घर करायचं. पण वाचन म्हणजे पानं उलटणं नव्हे, तर शब्दांच्या अंतरंगात डोकावणं असतं, हे कळायला वेळ लागला. काही ओळींवर थांबून विचार केल्यावर त्या शब्दांचं गारूड मनात उतरू लागलं. आणि तेव्हाच समजलं – सतत पुढे निघालं तर काहीच उमगत नाही… योग्य ठिकाणी थांबणं, हेच खरं समजणं.
नात्यांतही हीच गोष्ट असते.
कधी कधी आपण इतकं गुंततो की, त्या नात्याचा अंधार आपल्यालाच झाकोळून टाकतो. थोडं थांबलो असतो, एखादा शब्द गिळला असता, किंवा एखादा अलगदपणे सांगितला असता, तर नातं तुटलं नसतं. पण आपण धावत राहतो – स्पष्टीकरण मागायला, अधिकार गाजवायला, अपेक्षा जपायला… आणि मग एक दिवस ते नातं संपतं. आणि शेवटी, मनात उरतो फक्त एक प्रश्न – "तेव्हा थांबलो असतो तर?"
डोंगर चढताना मधेच एखाद्या वळणावर थांबून मागे पाहिलं की, आपण किती उंच आलो हे लक्षात येतं. श्वास लागतो, दम लागतो, पण त्या क्षणाचं सौंदर्य काही वेगळंच असतं.
आयुष्य म्हणजे अशीच एक चढाई आहे.
थोडं थांबायचं, स्वतःला समजून घ्यायचं, नव्याने उभं रहायचं. न थांबता वर जात राहिलो तर दम लागतो… आणि चुकतोही.
कारकिर्दीत तर ही भावना अधिक ठळक.
प्रत्येक टप्पा पार करताना वाटतं — अजून पुढे जायचंय. पण जेव्हा आपण मागे वळून पाहिलं, तेव्हा दिसतं की किती मोलाची माणसं मागे राहिली, किती क्षण हुकले. कुठे तरी "थांबलो असतो", तर कदाचित सुखानं जगता आलं असतं.
जगण्यातले काही क्षण हे निव्वळ गतीसाठी नसतात, ते स्थैर्यासाठी असतात. प्रत्येक यश, प्रत्येक आनंद, प्रत्येक नातं ही एक विश्रांतीची जागा असते.
त्या जागेचं भान, त्या वेळेची जाणीव… हेच खरं शहाणपण.
थांबणं म्हणजे कधीच हार नव्हे.
थांबणं म्हणजे स्वतःशी संवाद साधणं, क्षणाशी नातं बांधणं, आणि आंतरिक शांततेकडे वाटचाल करणं. वादळाआधी जशी निसर्ग शांततेची ओलावा फेकतो, तसंच आयुष्यही. बाण सुटण्यापूर्वी कमान जितकी स्थिर, तितका बाण अचूक.
कारण आयुष्य ही रेस नाही… ती एक सूक्ष्म लयबद्ध चाल आहे.
थोडा थांबून, थोडा ऐकून, थोडा समजून…
पुढे चालताना जेव्हा योग्य ठिकाणी थांबता आलं, तेव्हाच पुढचं पाऊल सार्थक होतं.
– सुनिलदत्त कुलकर्णी
लिहिताना शब्द सुचत होते, पण मी थांबलो… विचार केला… आणि मग शब्दांना अर्थ दिला.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा