दिव्याची शिक्षा
दिव्याची शिक्षा ✍️ सुनिलदत्त कुलकर्णी, वाळूज काही माणसे आयुष्यात दिवे पेटवत असतात. त्यांच्या हातात मशाल नसते, त्यांच्या नावाभोवती प्रसिद्धीचे वलय नसते, त्यांच्या पाठीमागे घोषणांचा गजर नसतो. ते शांतपणे एखाद्या विद्यार्थ्याच्या मनात आत्मविश्वास जागवतात, एखाद्या सहकाऱ्याच्या क्षमतेला दिशा देतात, एखाद्या नवख्या कर्मचाऱ्याच्या भीतीवर ज्ञानाचा हात ठेवतात. त्यांचे कार्य दिसते कमी; पण त्याचे परिणाम दूरवर पसरत राहतात. परंतु जगाचा एक विलक्षण स्वभाव आहे. त्याला प्रकाशापेक्षा सावल्या जास्त आकर्षित करतात. दिवा किती उजेड देतो यापेक्षा त्याच्या मागे किती अंधार आहे, हे शोधण्यात अनेकांना अधिक रस असतो. त्यामुळे ज्ञान वाटणाऱ्या व्यक्तीच्या कृतींपेक्षा त्याच्या हेतूंवर चर्चा जास्त होते. त्याने किती लोकांना घडवले यापेक्षा त्याला किती मान्यता मिळाली, याची मोजदाद सुरू होते. मग प्रश्न उभे राहतात. एखाद्या यादीत त्याचे नाव का? एखाद्या छायाचित्रात तोच का? एखाद्या व्यासपीठावर त्याला संधी का? हे प्रश्न वरकरणी साधे वाटतात; पण त्यामागे अनेकदा वस्तुनिष्ठतेपेक्षा मनातील अदृश्य अस्वस्थता लपलेली असते. कारण माणूस व...