पावलांनी चाललेली श्रद्धा… ✍️ ललित लेख

पावलांनी चाललेली श्रद्धा… ✍️ ललित लेख

पावसाच्या हलक्या सरी, मातीचा मंद सुगंध, ढगांनी झाकोळलेलं आभाळ आणि त्यात विठुरायाच्या गजराने निनादत चाललेली पावलं…

आषाढी वारी ही केवळ परंपरा नाही. ती आपल्या सांस्कृतिक जडणघडणीतील एक जिवंत श्वास आहे. आणि तो श्वास घेताना चाललेलं प्रत्येक पाऊल म्हणजे एक जप, एक ध्यान, एक तपच.

यंदा झेंडेवाडी ते सासवड या सुमारे साडेआठ किलोमीटरचा टप्पा पार करताना माझ्या पावलांना नुसतं चालावं लागलं नाही, तर भावनांच्या ओघात वाहून जावं लागलं. या आधी 2022 मध्ये 40 किलोमीटर, 2023 मध्ये 32 किलोमीटरचा प्रवास केला होता. 2024 मध्ये मात्र सबस्टेशनमध्ये आयसीटीच्या हॉटस्पॉटने अडवणूक केली. पण यंदा 2025 मध्ये, पुन्हा एकदा तीच वाट, तीच ऊर्जा, तोच ठेका, आणि तेच अंतःकरणातलं ओलेपण…

वारी म्हणजे चालणं, पण केवळ शरीराने नाही… मनानं, भावनेनं, श्रद्धेने चालणं.
"चालताना थांबायचं नाही आणि थांबत थांबत चालायचं नाही."
ही वारीची शिकवण केवळ पावलांची नाही, ती जीवनाचीही आहे. चालण्याचा वेग कितीही संथ असो, सातत्य असेल तर कोणतीही पायवाट पार होतेच.

वारीत चालताना वाटेत भेटतो एक गायक, टाळ वाजवत भजन गातो… त्याच्या गजरातच आपल्या थकलेल्या पावलांना बळ मिळतं. कोणीतरी अभंग म्हणतं – "पंढरीनाथा माजा..." आणि नकळत आपणही त्याच सुरात मिसळतो. मन शांत होतं, विचार निवतात, आणि शरीर कसलंच तक्रार करत नाही.

वारीत कोणी मोठं नाही, कोणी लहान नाही. सगळे एकसमान. सगळ्यांच्या कपाळावर चंद्रकोर. कुणाच्या डोळ्यांत अश्रू, कुणाच्या ओठांवर स्मित. पोटासाठी, लेकरांसाठी, आरोग्यासाठी, मनःशांतीसाठी – कोणाचंही कारण असो, सगळ्यांना घेऊन चालणारी ही  पालखी म्हणजेच श्रद्धेचं साक्षात रूप.

वारीचा एक तरी टप्पा अनुभवला पाहिजे. कारण त्या टप्प्यात "मी" हरवतो, आणि "आपण" जागं होतं.
वारीचा एक तरी उपटप्पा चालून बघा, कारण तिथे "गंतव्य"च नव्हे, तर "प्रवास"ही महत्त्वाचा वाटतो.

आज मी जेव्हा झेंडेवाडी ते सासवड चालून जेजुरीला परत आलो, तेव्हा हे काही केवळ एक टप्प्याचं यश नव्हतं… ती होती एक पूर्ण झालेली भावना. एक उलगडलेली प्रतिज्ञा. आणि हो, ती होती पुन्हा चालण्यासाठीची नविन उर्जा…

तर मग, तुम्ही येताय ना?
मंगळवारी, सासवड ते जेजुरी,
नुसती वारी नाही – पावलांच्या श्रद्धेची गाथा अनुभवायला…

"पाऊलवाटेवर चालताना,
विठू माउलीचा हात लागतो,
अन मनामध्ये शांततेचं
एक मोठ्ठं वादळ उठतं…"


(लेख: सुनिलदत्त कुलकर्णी)










 



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अविनाश निंबाळकर : साधेपणातून घडलेला अर्थपूर्ण जीवनप्रवास

दामिनी : आतल्या आकाशात चमकलेली वीज

🎖️ गौरव पत्र 🎖️ईएचव्ही यंत्रणांच्या वतीने मा. संचालक (प्रकल्प) श्री. अविनाश निंबाळकर साहेब यांना