पाऊले चालती… जेजुरीच्या वाटेवर…
पाऊले चालती… जेजुरीच्या वाटेवर… (ललित लेख)
आज मंगळवार. दिनांक २४ जून २०२५.
सकाळची आठची वेळ. ढगांच्या ओढीने काळवंडलेलं आभाळ, आणि त्या आभाळातून टपटपणाऱ्या सरी — जणू स्वर्गातूनच पडणारा भावनांचा अभिषेक… सासवडच्या परीसरात पावले टाकली आणि विठ्ठलनामाचा गजर कानी पडताच अंतःकरण हलकं झालं.
वारीच्या पावलांना कधी गडगडाटी गती असते, कधी शांत सरीसारखी चाल असते. पण तिच्यातली श्रद्धा मात्र नेहमीच झंझावातासारखी असते.
आणि मी… त्या झंझावातात, सावध आणि सजग, पावलं टाकत होतो.
वारकऱ्यांची गर्दी तर होतीच, पण ऊर्जा मात्र प्रचंड होती. कुणी अभंग गात, कुणी मृदंगावर ठेका धरत, कुणी भर रस्त्यावर नाचत, तर कुणी शांतपणे गजरात तल्लीन होऊन चालत होतं. एकमेकांना ओळखत नव्हतं कुणीच, पण सगळ्यांच्या श्वासात एकच सूर होता — "विठ्ठल… विठ्ठल…"
रस्त्याच्या कडेला, ओल्या सडसडीत जागेत उभं राहून खिचडी वाटणाऱ्या हातांनी मला थांबवायचा प्रयत्न केला. पण यावेळी मी ठरवलं होतं – न थांबता, न वळता, न विसावता चालायचं. चालायचं कारण वाट थांबत नव्हती… आणि चालणं थांबलं की वारीचं खरं प्रयोजन हरवतं.
चालताना एका माऊलीकडे माझं लक्ष गेलं. हातात टाळ, कपाळावर चंद्रकोर, डोळ्यांत विठू नामाच्या प्रकाशाची झाक. त्या माऊलीत मला दिसली माझी आई.
हो, माझी आई — एक साधी प्राथमिक शिक्षिका. पुढे शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून सेवानिवृत्त. पण तिचा खरा परिचय म्हणजे कष्टाळू माऊली.
तिनेही वारी केली होती— आळंदी ते पंढरपूर, पण तिची खरी वारी होती ज्ञानाची. माझ्यासारख्या लेकरांसाठी ती विठ्ठल होती. आम्हाला इंग्रजी, गणित, विज्ञान या विषयांचे पाठ देताना ती शिक्षिका नव्हती… ती भक्त होती. एक सच्ची साधिका.
आईच्या पदस्पर्शातूनच मला 'मार्ग' लाभला. तिच्या न थकणाऱ्या पावलांनी मला जीवनाच्या वारीची दिशा दिली. आणि आज… हजारो माऊल्यांमध्ये चालताना प्रत्येक माऊलीत मला माझी आई दिसत होती.
प्रत्येक पावलात तिच्या तळहाताची ऊब होती, प्रत्येक ओलावलेल्या गजरात तिच्या शब्दांची ताकद होती.
वारी म्हणजे चालणं नसतं फक्त — ती असते श्रद्धेची तपश्चर्या.
वारी म्हणजे भक्तीचं चालतं चित्र.
वारी म्हणजे – "थांबायचं नाही, पण थांबलेल्यांनाही हात द्यायचा."
वारी म्हणजे – "मी" विसरून "आपण" होणं.
सासवड ते जेजुरी या टप्प्याने मला पुन्हा एकदा 'स्वतःकडे' नेलं.
त्या चालीत शरीर थकलं असेल, पण मन मात्र जिंकलं.
आणि शेवटी जेव्हा पुन्हा 400 केव्ही ग्रहण केंद्र जेजुरी कार्यालयात आलो, तेव्हा वाटलं —
"ही दुसरी एक वारीच … आणि ही पालखी विजेची, सेवा-कर्तव्याची ."
वारीने जे शिकवलं तेच मी आज माझ्या खांद्यावर वागवत होतो — महापारेषणची पालखी.
विठ्ठलाच्या पायाकडे चालणाऱ्या पावलांनी मला कर्तव्यासाठी पुन्हा सज्ज केलं.
कारण —
"विठ्ठल केवळ पंढरपुरात नसतो… तो तुमच्या माझ्यासारख्या जेजुरीतल्या सबस्टेशनमध्येही असतो,
फक्त त्याच्या दर्शनासाठी लागतात – ओलावलेली पावलं, आणि अंतःकरणातली श्रद्धा."
(लेखन: सुनिलदत्त कुलकर्णी)
— "एक वारकरी… आणि एक वीजपारेषणचा रक्षक"!

वारी वर्णन वाचता वाचता कधी वारीत जाऊन तुमच्या सोबत मनातून चालू लागलो सोबत विठूराया ही आपणा सोबत चालताना दिसला! उत्कृष्ठ लेखन !!
उत्तर द्याहटवा