"अंधारातून प्रकाशाकडे"

अंधारातून प्रकाशाकडे

डोंगरमाथ्यावरून उतरताना सावली फारच जवळची वाटते. वाट हरवली की कोणीतरी हात द्यावा, डोळे भरून सांत्वन द्यावं, असं मन म्हणतं. पण जीवन ही अशी वाट आहे की, इथे प्रत्येक वळणावर माणसाला एकटं पडायचं असतं… स्वतःच्या सावलीचाही विसर पडेल इतकं.

शुभम नावाचा तरुण, एका लहानशा गावातून पुण्यात आला होता – शिक्षणासाठी, नोकरीसाठी आणि आयुष्य घडवण्यासाठी. सुरुवातीला नातेवाईक होते, ओळखीचे होते, पण जसजसा वेळ गेला, त्याचं अस्तित्व तिथं बटबटीत होत गेलं. फोनही उचलणं कमी झालं आणि ‘आम्ही आहोत रे’ हे वाक्यही केवळ औपचारिक रहात गेलं.

एका आठवड्यात दोन वेळचं जेवण मिळणंही कठीण झालं. कोणी सोबत नव्हतं. पण त्या उपासमारीच्या रात्रीत शुभमने एक गोष्ट ठरवली –
"कोणाच्याही सावलीखाली उभं राहायचं नाही… स्वतःची सावली एवढी घडवायची की तीच मला निवारा देईल."

पुस्तकांच्या पानांत डोकं घालून अभ्यास सुरू केला. कामं मिळत गेली – अगदी बड्या हॉटेलात डिश वॉशरपासून ते कॉलेजात नाईट लायब्ररी असिस्टंटपर्यंत. साखरझोप विकली, पण स्वप्न नाही. सुट्टीच्या दिवशी पाय थकले तरी डोळ्यांत चमक होती – आपण कुणावरही अवलंबून न राहता हे करत आहोत, हे समाधान.

पाच वर्षांत शुभम MPSC पास झाला. आज तो उपजिल्हाधिकारी आहे.
मात्र, यशाच्या त्या खुर्चीत बसताना त्याने कधीच कोणालाही दोष दिला नाही की सोबत न दिल्याबद्दल खंत व्यक्त केली नाही… कारण त्याला कळून चुकलं होतं –

“सोबत नसणं हे दु:ख नाही… ती संधी असते – स्वतःच्या असण्याची साक्ष देण्याची.”

शेवटी, हेच खरे –
स्वतःवरचा विश्वास ही सर्वात मजबूत ढाल असते.


**मदतीची वाट पाहणाऱ्यांना केवळ आधार मिळतो; पण स्वतःची वाट चोखाळणाऱ्यांना अस्तित्व मिळतं, ओळख मिळते, आणि अंतःकरणातून उमटलेला अभिमान मिळतो – की हे सर्व स्वतःच्या हिमतीवर घडलंय! **

आणि या जगात स्वतःवर जितकं प्रेम करता येईल, तितकं कोणाच्या मिठीत सुद्धा मिळत नाही...

✍️ लेखन- सुनिलदत्त कुलकर्णी, जेजुरी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अविनाश निंबाळकर : साधेपणातून घडलेला अर्थपूर्ण जीवनप्रवास

दामिनी : आतल्या आकाशात चमकलेली वीज

🎖️ गौरव पत्र 🎖️ईएचव्ही यंत्रणांच्या वतीने मा. संचालक (प्रकल्प) श्री. अविनाश निंबाळकर साहेब यांना