*टेकऑफ तर घेतलाय… पण लँडिंगचं काय?*

 *टेकऑफ तर घेतलाय… पण लँडिंगचं काय?*

(एक अंतर्मुख ललित लेख)
कंपनीत दोन वर्षांपूर्वी कार्यकारी म्हणून टेकऑफ घेतला.
टेकऑफ – हो, अगदी तसाच… उंच भरारी, कौतुकाच्या टाळ्यांनी भारावलेलं मन, खांद्यावरचा नवीन दर्जा, जबाबदारीचा ठसा. सभोवतालच्या लोकांचे नजरानजर होणं बदललं. काहींनी अभिनंदन केलं, काहींनी पोटात पाणी आणलं, काहींनी “बघू किती दिवस टिकतो…” असं मनातल्या मनात पुटपुटलं.
सुरुवातीला वाटलं – हीच ती क्षणांची सरगम!
पण टेकऑफ नंतरच्या प्रवासात जाणवलं, विमान उडतंय… पण कुठे जातंय, कुठे पोहोचायचंय, हे विमानच विसरलेलं आहे.
अनेकवेळा वाटतं, ही प्रवासाची दिशा माझ्या हातातच नव्हती.
कारण ही फक्त माझी भरारी नाही, ही यंत्रणेमधल्या असंख्य झंझावाती वाऱ्यांतून जाणारी एक संरचनात्मक गूढगती आहे.
प्रश्नांचे ढग आहेत, अनिश्चिततेचे वादळ आहे, राजकारणाचे अंधारलेले आकाश आहे… आणि हृदयात मात्र एक न थांबणारा प्रश्न – हे सगळं सोडवायचं की सोडून द्यायचं?
एखाद्या प्रश्नाला उत्तर नसतं, किंवा असावं लागत नाही.
कधी कधी प्रश्न फक्त सोडवायचे नसतात – सोडून द्यायचे असतात.
कदाचित लँडिंगचा विचारच आपण करत राहतो म्हणून क्लेश होतो…
कधीकधी आयुष्य म्हणतं – *"फक्त उडत राहा… जिथे जमेल तिथे टेकणारंच आहात!"*
पण हे *"जमेल तिथे टेकणं"* हीसुद्धा एक ललित कल्पना आहे.
कारण *टेकऑफ ही 'घटना' असते.*
*पण लँडिंग… ती एक नियती असते.*
आजवर अनेक निर्णय, योजना, नियोजनं – एका ठराविक कार्यक्षमतेच्या संकुचित पट्ट्यात अडकून पडलेत.
मन म्हणतं – *यंत्रणेला बदलायचं तर आपल्या विचारांची दिशा आधी बदलावी लागेल.*
आणि मग अचानक मनात येतं –
"जाऊ दे… हा प्रश्न तसाच राहू दे…"
सध्या हेच चाललंय – एक न संपणारा हायटेंशन प्रवास.
आणि मी… फक्त एक चालक नव्हे…
कधी प्रवासी, कधी पर्यवेक्षक… कधी काहीच नाही.
फक्त एक ‘कार्यकारी’ –
ज्याचं विमान टेकऑफ तर झालंय…
पण लँडिंग कुठे होईल… ते अजूनही धुक्याच्या पलीकडे आहे.
(लेखन : सुनिलदत्त कुलकर्णी)
(कार्यकारी अभियंता, महापारेषण – जेजुरी)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अविनाश निंबाळकर : साधेपणातून घडलेला अर्थपूर्ण जीवनप्रवास

दामिनी : आतल्या आकाशात चमकलेली वीज

🎖️ गौरव पत्र 🎖️ईएचव्ही यंत्रणांच्या वतीने मा. संचालक (प्रकल्प) श्री. अविनाश निंबाळकर साहेब यांना