ज्ञानदिपाची ज्योत: मुक्ततेची कला

 ज्ञानदिपाची ज्योत: मुक्ततेची कला

एक वेळ होती… गुरुकुलात एक साधा, शांत आणि बुद्धिमान विद्यार्थी शिकत होता. ऋषिंकडे तो मन लावून सगळं ऐकायचा, शब्द न शब्द पोटात घ्यायचा, ग्रंथ वाचायचा, श्लोक पाठ करायचा. दिवसेंदिवस त्याचं स्मरणशक्तीचं कौतुक वाढत गेलं. इतर विद्यार्थी विसरत गेले, तो मात्र सगळं मनात साठवत राहिला.

दहा वर्षांनी तो गुरुकुलातून बाहेर पडला. ज्ञानाचं गाठोडं त्याच्या डोक्यावर होतं. पण आयुष्याच्या रस्त्यावर उतरल्यानंतर काहीच घडलं नाही. कुठेच तो ज्ञान वापरू शकला नाही, कुठेच लोकांना त्याचं महत्व वाटलं नाही. लोक त्याच्याकडे पाहायचे, ऐकतही, पण संवाद घडायचा नाही… प्रभाव निर्माण होत नसे.

एक दिवस तो त्याच्या जुन्या गुरुंना भेटायला गेला. गुरु हसले, म्हणाले,

"पुत्रा, तुझं ज्ञान ‘तुझं’च राहिलं… इतरांचं व्हायला हवंच होतं.

ज्ञान पाण्यासारखं असतं – वाहत राहिलं तर जीवन देतं, साठवलं तर कुजतं."

त्या विद्यार्थ्याला हे उमगायला वेळ लागला. पण जेव्हा त्याने आपलं ज्ञान इतरांमध्ये मुक्तपणे वाटायला सुरुवात केलं – शेतकऱ्यांना सल्ले दिले, गावातल्या मुलांना शिकवायला लागला, उपेक्षितांना नवीन दृष्टिकोन दिला – तेव्हा एक जादू घडू लागली.

त्या दिवशी त्याने समजून घेतलं,

"ज्ञान हे संग्रह करण्यासाठी नसतं, वाटण्यासाठी असतं.

शब्द साठवले की ते पुस्तक होतात, पण मुक्त केले की ते प्रकाश बनतात."

शिकवण:

संग्रहाच्या छायेत माणूस पाणवठा होतो, पण मुक्ततेच्या प्रकाशात तो झरा बनतो.

ज्ञान साठवलं की तो अभिमान होतो, पण दिलं की ते समाजाचं संजीवनी बनतं.

जन्माने माणूस शिकतो, पण मुक्तपणे देतो तेव्हा ‘महान’ होतो.

✍️ लेखन- सुनिलदत्त कुलकर्णी, जेजुरी 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अविनाश निंबाळकर : साधेपणातून घडलेला अर्थपूर्ण जीवनप्रवास

दामिनी : आतल्या आकाशात चमकलेली वीज

🎖️ गौरव पत्र 🎖️ईएचव्ही यंत्रणांच्या वतीने मा. संचालक (प्रकल्प) श्री. अविनाश निंबाळकर साहेब यांना