"पूर्णत्वाचा दृष्टिकोन"
"पूर्णत्वाचा दृष्टिकोन" ललित लेख
✍️ सुनिलदत्त कुलकर्णी
एका लहानशा गावात दोन मित्र राहत होते – समीर आणि अमित. दोघंही शेतकरी कुटुंबातून आलेले, शिक्षण पूर्ण करून शहरात स्थायिक झालेले. आयुष्याचं गणित दोघांचंही जवळपास सारखंच – नोकरी, घर, संसार… पण एक मूलभूत फरक होता – जगण्याकडे पाहण्याचा.
समीरचा चेहरा नेहमी प्रसन्न असायचा. सकाळचा चहा घेतानाच त्याच्या चेहऱ्यावर समाधानाचं तेज दिसायचं. ऑफिसमध्ये सहकाऱ्यांसोबत हसतखेळत दिवस काढायचा. त्याचं बोलणं असायचं, "अरे, घर आहे, बायको आहे, दोन छान मुलं आहेत, आरोग्य ठिकठाक आहे… अजून काय हवं?"
आणि अमित?
तो नेहमी काहीतरी हरवलेलं शोधत असायचा. "कोणती गाडी घेतोय यार? माझ्या गाडीपेक्षा भारी आहे…, माझा मुलगा अभ्यासात लक्ष देत नाही…, त्या प्रमोशनमध्ये मला वगळलं, म्हणजे काय उपयोग इतकं काम करून?"
आयुष्यात सगळं असूनही काहीतरी 'नसलेलं' त्याच्या दृष्टिकोनातून मोठं दिसायचं. आणि म्हणूनच समाधानाच्या जागी सतत असंतोषाची धग पेटलेली असायची.
समीर एकदा सहज म्हणाला, "आपल्याला जे आहे त्यातून समाधान शोधता आलं, तर आयुष्य खऱ्या अर्थानं आपलं होतं. नाहीतर, ह्या शोधायच्या यादीत आपली सारी शांती हरवते."
त्या दिवशी मला एक फार मोठा धडा मिळाला – जीवनात ‘पूर्णत्व’ बाहेरून येत नाही, ते दृष्टीकोनातून निर्माण होतं.
ताटातलं अन्न पाहून जर कोणीतरी म्हणालं, "मीठ थोडं कमी आहे," आणि दुसरं म्हणालं, "बापरे! एवढं भरलेलं ताट आहे, किती आभार मानावेत?" — तर दोघांमध्ये नेमकं अंतर काय आहे? त्यांचं अन्न नाही, तर त्यांच्या नजरेतली कृतज्ञता!
आपल्याकडे काय आहे, हे पाहणं ही एक कला आहे. आणि हीच कला आपल्याला आनंदाच्या दारापर्यंत नेत असते.
जगात सुखी माणूस कोण?
तोच, जो हातात असलेल्या फुलांचा सुगंध घेतो.
बाकी, फुलांची कमतरता शोधत बसणारे… त्यांना वसंताचंही अस्तित्व जाणवत नाही.
– अर्थगर्भ जीवन चिंतन.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा