काही चारोळ्या

राजा *रसिक* असेल
तर मिळतो *मानसन्मान*
रसिक *राजा* असेल
तर मिळते *समाधान*


तुम्ही असाल कितीही
प्रतिभावंत आणि *मेहनती*
असेल राजाचा *वरदहस्त*
तरच होते तुमची *उन्नती*

कळस हाती आला तरी ,जमिनीवर घट्ट होते *पाय*
ज्यांनी केलं मोठं त्यांना आम्ही कधी विसरत *नाय*
गुरु *वसंत*, आम्हा पसंत ,मन *अडके* श्रीधरात
*पानसे* आणि माणसे, आजही जपतो हृदयात


कळत नाही कुणाच्या मनात
काय काय *बेत* आहेत
काल कडवट बोलणारे
आज तिळगुळ *देत* आहेत


अंधारात केलेली मदत

उजेडात लक्षात *रहात* नाही

उगवत्या सूर्याला नमस्कार करणारा

मावळत्याकडे ढुंकूनही *पहात* नाही


पाय हवेत, आकाश कवेत
फार काळ *टिकत* नाही
स्वतःला ठेच लागल्याशिवाय
माणूस काही *शिकत* नाही

तुम्ही आमच्याकडे नाही फिरकले
नाचताना आम्ही, तुम्ही नाही थिरकले
एक दिवस अगोदरच त्यांचे तिळगुळ मिळले
त्यांचे शब्द आणि आमचे आवंढे
आम्ही चुपचाप गिळले
साधला असता अगोदरच संवाद, झालं असतं बरं
समजून तरी घ्यायचं असतं काय खोटं ,काय खरं

एकाचं कोडकौतुक करताना
दुसऱ्याचे तोडायचे नसतात लचके
राहिलं पाहिजे आपण आता
अशा लोकांपासून बचके

गलितगात्र शरीर, गलितगात्र मन,
सगळंच कसं झालं आहे *ठप्प*
वस्त्रहरणात ज्यानी पुरवायची वस्त्र
तोच का बरं झाला असेल *गप्प*

काल ज्यांच्यासाठी आदर्श होतो
ते आज आमच्यावरच *घसरले*
अरे आम्हीच घेतलं होतं खांद्यावर
आज उंची गाठली की *विसरले*


नसले जरी बळ प्रहाराचे
तरी मानणार नाही *हार*
शेवटच्या माझ्या श्वासापर्यंत
वाहिन मी न पेलणारा *भार*

संघर्षा सोबत आमची
तशी जुनीच *यारी* आहे
संकटांनो तुटून पडा
लढायची *तयारी* आहे

पुढचे रस्ते आव्हानांनी व्यापले
मागचे परतीचे दोर *कापले*
ज्यांनी दिल्या खोल जखमा
तेही होते जवळचे *आपले*

त्यांनी जिंकली बाजी,
पुण्य आले नाही फळा
चहुबाजूनी झाली कोंडी,
आता कुठे पळा



काल माझ्यासाठी, आज तुझ्यासाठी

टाळ्या वाजवत आहेत *सर्व*

पण लक्षात ठेव हे क्षणभंगुरंय

मग कशाला करायचा *गर्व*


करू नकोस मित्रा व्यसन
आयुष्य होईल उध्वस्त
जगणं होईल महाग
आणि मरण होईल स्वस्त


जे आज उगवले
ते वर्षांपूर्वी *पेरले* होते
आपली ताकद, आपले गुण
त्याचवेळी *हेरले* होते


अर्जुनाचा कृष्ण होणं
प्रत्येकाला *जमलं* पाहिजे
गोकुळ असो वा कुरुक्षेत्र
कृष्णासारखं मन *रमलं* पाहिजे


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अविनाश निंबाळकर : साधेपणातून घडलेला अर्थपूर्ण जीवनप्रवास

दामिनी : आतल्या आकाशात चमकलेली वीज

🎖️ गौरव पत्र 🎖️ईएचव्ही यंत्रणांच्या वतीने मा. संचालक (प्रकल्प) श्री. अविनाश निंबाळकर साहेब यांना