*भावपूर्ण श्रद्धांजली… 'आण्णा'—भालचंद्र पानसे यांना*- लेख
*भावपूर्ण श्रद्धांजली… 'आण्णा'—भालचंद्र पानसे यांना*.
मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ, नावाजलेले रंगकर्मी—ख्यातनाम दिग्दर्शक, नाट्यनिर्माते आणि अभिनेते *भालचंद्र पानसे… आपल्याला ज्यांना प्रेमाने "आण्णा" म्हणायचो* —यांचे दिनांक १६ एप्रिल २०२५ रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या जाण्याने एक अत्यंत प्रतिभावान, सच्चा आणि निष्ठावान रंगकर्मी हरपला. मराठी रंगभूमीचं हे मोठं अपार नुकसान. आण्णांना मनःपूर्वक, अश्रुपूरित श्रद्धांजली.
१९७५ पासून त्यांनी ३५ हून अधिक व्यावसायिक नाटकांच्या निर्मिती, दिग्दर्शन व नेपथ्याची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. १९६९ साली हौशी रंगभूमीवरून प्रवास सुरू करून, ‘सुनो जन्मेजया’ या नाटकाच्या दिग्दर्शनासाठी त्यांनी रौप्यपदक पटकावलं. १९७२ मध्ये ‘हयवदन’ आणि ‘एक कळी फुललीच नाही’ अशा दर्जेदार नाट्यकृतींमधून त्यांना विविध मान्यवर पुरस्कार लाभले.
त्यांचा रंगमंचावरील प्रवास सुरू झाला १९६० साली—नुमवि प्रशालेतील ‘दुरितांचे तिमिर जावो’ या नाटकातून. एकदा रंगभूमीची चव चाखल्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलंच नाही. तब्बल ९४०० हून अधिक प्रयोग करत त्यांनी रंगभूमीवर आपला अमीट ठसा उमटवला.
नाटक हेच त्यांच्या जीवनाचं प्रथम आणि अंतिम प्रेम होतं. पण त्याहीपलीकडे जाऊन त्यांनी चित्रपट, लघुपट आणि दूरदर्शन मालिकांमधूनही आपल्या अभिनयाची जादू दाखवली—‘सुगंधा’, ‘आघात’ सारख्या चित्रपटांतून आणि ‘न्यायदेवता’, ‘इथे नांदतो बाळू’ यांसारख्या मालिकांमधून.
त्यांची एक खास ओळख होती ती त्यांच्या जाहिरातशैलीच्या कल्पकतेमुळे. त्यांनी स्वतः तयार केलेल्या जाहिराती नाटकांना एक वेगळीच उंची मिळवून देत. 'कुर्यात सदा टिंगलम' या नाटकाची जाहिरात हे त्याचं अत्युत्तम उदाहरण! या नाटकाचा ४२५ वा प्रयोग एका दिवशी दोन वेगवेगळ्या नाट्यगृहांत सादर होणं हा त्यांच्याच कार्यतत्परतेचा आणि नाट्यवेडाचा विक्रम होता.
आण्णांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही—महापारेषण कंपनीतील कलावंत —विविध नाट्यकृती सादर केल्या. ‘प्रश्न कायद्याचा आहे’ (आनंद म्हसवेकर), ‘डील दा माॅमला’ (सुहास देशपांडे), ‘सवाल अंधाराचा’ (प्र.ल.मयेकर), आणि ‘लाली’ (धनंजय सरदेशपांडे) यांसारख्या नाटकांत आम्ही भाग घेतला व यश ही मिळवले.
या सादरीकरणांच्या तयारीत आण्णांनी आम्हाला भरभरून प्रेम दिलं. अभिनय, नेपथ्य, प्रकाश योजना, संवादफेक, उच्चार, रंगमंचीय सादरीकरण—या प्रत्येक पैलूत त्यांनी आम्हाला अत्यंत बारकाईने मार्गदर्शन केलं. "भूमिकेला आत्मा कसा द्यायचा", याचं आम्हाला खरंखुरं शिक्षण मिळालं—फक्त आणि फक्त आण्णांमुळे.
*आण्णा,*
*तुमच्यामुळेच आम्हाला नाटक कळलं…*
*एन्ट्री म्हणजे काय, एक्झिट म्हणजे काय,*
*आणि रंगमंचावरचं अस्तित्व म्हणजे काय—हे सगळं तुमच्यामुळे उमगलं.*
*आणि आज… तुम्ही अशी एक्झिट घेतली आहे की, आता पुन्हा एन्ट्रीच नाही…*
*पण तुमचं स्मरण, तुमचं कार्य आणि तुमचं मार्गदर्शन*
*आमच्या हृदयात सदैव जागं राहील.*



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा