अजून काहीच संपलेलं नाही…
🌅 अजून काहीच संपलेलं नाही… 🌅
✍️ सुनिलदत्त कुलकर्णी, जेजुरी
रात्र उलटतेय… घड्याळाच्या काट्यांना थोडीशी घाई झालीय. पण आभाळ अजून काळोखात गुरफटलंय. एक चांदणं आडवं झोपलेलं… आणि वारा – जणू कोणीतरी त्याच्या कानात सतत कुजबुज करतंय अशा बेचैन लयीत वाहतोय.
तुझा जीवसुद्धा असाच – अनावर, थबकलेला, पण आतून हलत राहणारा. खिडकीपलीकडून झिरपत येणाऱ्या गार झुळुकीसारखं, मनात थोडंसं निराशेचं आणि थोडंसं कुठल्याशा अदृश्य अपेक्षेचं पसरलेलं जाळं…
तू स्वतःला विचारतोस –
"किती चालायचं अजून?"
"हे अपयशाचे साचलेलं ढग किती काळ तसेच राहणार?"
"ही वाट खरी की फसवी?"
…आणि मग क्षणभर वाटतं — बस, झालं आता. काहीच उरलं नाही.
पण… खरंच?
"अजून काहीच संपलेलं नाही"
कारण जीवन कुठेच 'पूर्णविराम' देत नाही —
ते फक्त स्वल्पविराम देतं… थांबायला, पाहायला, पुन्हा चालायला.
कधी एखादी अपयशाची रात्र इतकी लांब असते, की तिला पाहताना सकाळचं अस्तित्वही खोटं वाटायला लागतं.
पण तरीही… पहाट उगवतच असते.
कधी वाटेत, तर कधी उशिरा…
कधी तुझ्या अपेक्षेहून भिन्न रूपात, पण ती येतेच!
एक हळवं उदाहरण…
ती – एका लहानशा खेड्यातली मुलगी. चौथीच्या वर्गात.
पाठीवर थोडीशी विसकटलेली वेणी, चेहऱ्यावर गोंधळलेली पण जिवंत नजर.
शिक्षकांनी विचारलं — “मोठं होऊन काय होणार गं?”
सगळी मुलं हसत हसत बोलली – डॉक्टर, इंजिनिअर, पोलीस…
ती मात्र गप्प.
शिक्षकांनी हळूच विचारलं, “बोल ना गं!”
ती म्हणाली —
“माझ्या मनातलं ‘मी’ जेव्हा तयार होईल… तेव्हाच मी ‘मोठी’ होईन…”
…दहा वर्षांनी तीच मुलगी, शहरात एकटी राहून स्पर्धा परीक्षा देत होती.
अपयशांनी मन उद्ध्वस्त केलं होतं, स्वप्नांची भाषा थांबली होती…
पण तरी ती चालत राहिली. पुन्हा. पुन्हा.
आणि एका साध्याशा निकालाच्या यादीत, तिला तिचं नाव दिसलं.
ती थरथरत म्हणाली —
“आजचा दिवस… मी खूप आधीपासून वाट पाहतेय.”
आपण सगळेच त्या एका दिवसाची वाट पाहणारे…
कधी ही वाट अपयशांच्या काट्यांनी भरलेली,
कधी अपेक्षांच्या ओझ्याखाली झुकलेली,
कधी मनाच्या थकव्याने थांबलेली…
पण तरीही —
“उद्या” या कल्पनेत एक प्रकारची सुंदर गुंतवणूक असते.
तो आला नाही तरी त्याची वाट पाहणं आपल्याला जगतं ठेवतं.
तो गवसतो तेव्हा, सगळी झीज एकाएकी अर्थपूर्ण होते.
म्हणूनच… अजून काहीच संपलेलं नाही!
तुझं स्वप्न संपलेलं नाही,
तुझी वाट हरवलेली नाही,
तुझं प्रयत्न करायचं सामर्थ्य थकलेलं नाही,
…आणि तू स्वतः – अजून हरलेला नाहीस!
जिथे सगळं संपतं असं वाटतं –
तिथंच नवा ‘आरंभ’ जन्म घेतो.
"जीवनाची गोष्ट अजून लिहायची आहे… अजून काहीच संपलेलं नाही!"
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा