“उभ्या असलेल्या रिकाम्या खुर्च्या…” 🕯
🕯 “उभ्या असलेल्या रिकाम्या खुर्च्या…” 🕯
✍️ सुनिलदत्त कुलकर्णी, जेजुरी
काही गोष्टी ‘असतात’… पण दिसत नाहीत.
आणि काही जण ‘जातात’… पण अजूनही दररोज वावरताना जाणवतात.
ते नसतानाही असतात.
आणि ती अनुपस्थितीही हजेरी लावते —
वेळेवर, हळूच… थेट मनात.
तीन अभियंते —
दिवसाचे तीन प्रहरी,
कामाची तीन शकले,
आणि आमच्या जगण्याचे तीन धडधडते स्पंदन.
ते गेले…
ना वाजत-गाजत, ना तक्रारींचा डाव मांडत.
एक शांत आदेश आला…
आणि तीन सावल्या पाठमोरं वळल्या…
तसं म्हणायला, ‘रजा’ घेतली.
पण आम्ही मात्र अजूनही ‘त्यांची हजेरी’ रोज मोजतो आहोत.
आता त्या खुर्च्या रिकाम्या नाहीत…
त्या थकलेल्या आहेत.
बटणं दाबली जातात, फायली फिरतात, मेल्स येतात,
आवाज वाजतो —
पण त्या जागा जिवंत नाहीत.
कारण एक काळ होता…
जेव्हा हात काम करत होते, पण मन साथ देत होतं.
आजही कामं सुरू आहेत…
पण मनं गेली आहेत.
आणि त्यांच्या जागी कुणीच आलेलं नाही.
कधीतरी सत्तेच्या उंबरठ्यावर कुणीतरी म्हणालं असेल —
"जागा थोड्या कमी करा…"
आणि मग कुणीतरी, आमच्या विभागाकडे हसून म्हणालं असेल
"का हो, कामं होतायत ना? मग झालंच तर!"
त्यांना हे कळत नाही…
की कामं “होणं” म्हणजे फक्त मशीन फिरणं नसतं,
ते म्हणजे कोणीतरी मनानं जिवंत असणं!
एक माणूस, एका ब्लेझरच्या आत, एका हृदयासकट…
कामाच्या रक्ताभिसरणात सहभागी असणं!
तीन अभियंत्यांच्या अनुपस्थितीत,
आम्ही अजूनही चालू आहोत.
हो… खरंच चालू आहोत —
पण सुतात मळकट गाठ लागलीय.
ती गाठ दिसत नाही…
पण तुटण्याआधीचा ताण
प्रत्येक दिवशी, प्रत्येक संध्याकाळी…
अंतर्मनात चरकून ऐकू येतो.
कोणीतरी विचारलं असतं,
"कसं चाललंय रे?"
कुणीतरी हातावर हात ठेवून म्हटलं असतं,
"थांब रे, थोडा दम घेत जा…"
तर कदाचित ही पोकळी इतकी चवकटपणे टपकली नसती.
पण नाही —
कारण त्यांना वाटतं,
‘माणसं’ म्हणजे फक्त एक ‘युनिट’ असतं —
ज्यांचं स्थानक्रमण केलं, की काम पूर्ण होतं.
पण आम्ही युनिट नव्हतो…
आम्ही यंत्राच्या मागचं ‘मन’ होतो.
आता यंत्र चालतंय…
पण त्या मनांच्या रिकाम्या खुर्च्या
रोज आमच्या अस्तित्वातली मोजणी करत राहतात.
आणि शेवटी…
काही गोष्टी तुटतात,
आणि आवाज होत नाही.
काही हरवतात,
आणि कुणालाही त्याची जाणीव होत नाही.
आम्ही अजून आहोत…
त्या गेलेल्या सावल्यांना आठवणीत धरून,
त्याच रिकाम्या जागांमधून अजूनही
‘कामाला आकार’ देत…
पण एक प्रश्न रोज दाटतो —
‘कधीपर्यंत?’
🖋️
— रिकाम्या जागांवर सावलीसारखं उभं असलेलं मन.
“मोजता मोजता गेली माणसं…
शिल्लक राहिल्या – जबाबदाऱ्या,
आणि एक दीर्घश्वास घेणारं मौन…” 🕯

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा