रिक्त जागांची भरती
🕯 रिक्त जागांची भरती 🕯
✍️ सुनिलदत्त कुलकर्णी, जेजुरी
काही जागा रिकाम्या असतात.
त्यात माणसं बसतात,
फायली ठेवल्या जातात,
स्वाक्षऱ्या उमटतात…
आणि एक दिवस ती जागा,
एका माणसाच्या नावाने ओळखली जाऊ लागते.
पण…
काही जागा —
ज्यांना "रिक्त" म्हटलं जातं,
त्या प्रत्यक्षात रिक्त राहतच नाहीत.
त्या भरल्या जातात —
आठवणींनी… आवाजांनी…
अनुपस्थितीतल्या उपस्थितीने…
(वीज उपकेंद्रातून) तीन माणसं हलली.
कुठे गेली, कशी गेली, का गेली —
हे आम्ही विचारलं नाही.
कारण इथे प्रश्न विचारणंही
कधी कधी अपराधासारखं वाटतं.
"सिस्टीम चालू आहे ना?"
या एका वाक्याने
सर्व प्रश्न 'डिस्कनेक्ट' होतात.
हो… सिस्टीम चालू आहे.
पण हृदयाचा ‘फीडबॅक’ चुकतोय.
"रिले" काम करतंय,
पण ‘फॉल्ट क्लिअर’ करायला
आता मनाचं इम्पल्स वापरतोय.
ती माणसं गेली.
कोणी त्यांच्या जागा घेतल्या नाहीत.
पण त्या जागा 'रिक्त' राहिल्या का?
छे…
त्या जागा अजूनही भरलेल्या आहेत —
एका चप्पलखूणीत,
एका अर्धवट नोंदीत,
एका रखरखीत वळणावर जिथं एखादा हुंदका थांबलेला आहे…
रात्रीच्या शिफ्टला अजूनही वाटतं —
मेजवरची बाटली हलते,
खुर्ची थोडी मागे जाते,
कोणीतरी हळूच म्हणतं —
“मी असतो तर केव्हाच झालं असतं…”
कोणीतरी म्हणालं होतं —
"बदल घडतात… त्यांना स्वीकारा."
पण त्यांना कोणी सांगेल का —
माणसं 'बदलत' नाहीत…
ती 'रुतून' बसतात —
मनात, आठवणीत, आणि रिक्त खुर्च्यांमध्ये.
आम्ही अजूनही आहोत —
त्यांच्या न गेलेल्या अस्तित्वाबरोबर.
ती जागा मोकळी आहे,
पण आमचं मन ती ‘भरून राहिलेलीच’ मानतंय.
आजही पाठीमागून वाटतं —
कोणीतरी खांद्यावर हात ठेवेल,
"मी आहे…" असं म्हणेल…
पण लक्षात येतं —
ते कुणीतरी ‘होतं’.
आणि आता त्या जागा —
‘स्मरणरूप’ झाल्या आहेत.
शेवटी…
रिक्त जागा भरल्या नाहीत.
पण त्या भरून राहिल्या —
दडपलेल्या हुंदक्यांनी,
अनुत्तरित प्रश्नांनी,
आणि अशा व्यवस्थेने…
जिथं जाणाऱ्यांच्या जागा
'वर्कलोड’ ने मोजल्या जातात,
‘मनःभार’ ने नाही.
"वर्कलोड" पूर्ण झालय म्हणतात…
पण 'त्या' ने ठेवलेली वही
आजही उघडलेली नाही…
🖋️
— रिक्त जागांमध्ये मनाने बसून काम करत असलेली एक सावली.
🕯 जागा मोकळ्या नाहीत…
त्या माणसं हरवल्याचं स्मारक आहेत…
जिथं हलतं फक्त काम,
पण थांबत संपूर्ण आयुष्य…"** 🕯

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा