“काही क्षणांचा विधी…”
🕯 “काही क्षणांचा विधी…” 🕯
— एका न बोलता हरवलेल्या नात्याचं मौन गीत…
✍️ सुनिलदत्त कुलकर्णी, जेजुरी
"हसणं बाहेर पसरत होतं... आणि काळजातलं नातं मात्र संथपणे मरण पावत होतं..."
तो हसला… थोडा वेळ… टाळ्याही वाजवल्या. पण त्याच्या पापण्यांच्या आत…
एक अख्खं आयुष्य थरथरतं होतं.
काही क्षण असे असतात – जे साजरे होतानाच संपतात.
काही स्मित हास्यं अशी असतात – जी श्वासाआधी काळजात उतरतात…
ते हसू त्याचं नव्हतं.
ते टाळ्यांचे आवाजही त्याच्यासाठी नव्हते…
पण त्या सगळ्यात तोच उभा होता —
फक्त त्या क्षणात, तो तिथं नव्हताच…
कधी, कुठे, कसं —
आपलं पायघडं कुणीतरी उलगडलं,
हृदयाच्या आतल्या भिंती चोरपावलांनी भेदून गेलं,
हेच समजलं नाही…
फक्त समजत राहिलं –
की त्या नजरेखाली,
त्याच्या आतल्या माणसाचा शेलक्यागत मोड होतोय…
तो पाहत होता —
एका खांद्यावर विसावलेला विश्वास…
एका चेहऱ्यावर उमटलेला शांत उन्माद…
त्या क्षणात…
त्याचं सारं अस्तित्व, एखाद्या क्लिकमध्ये पारदर्शक झालं.
कधी काळी ज्याच्यासाठी त्यानं स्वतःला विसरलं,
ज्याच्यासाठी आपली प्रत्येक रात्रीची झोप तडजोड केली,
अंधारात कुणासाठी उजेड उधार दिला…
आज —
तोच स्वतः त्या बोटांच्या विळख्यातून हळूहळू निसटत होता…
🌿 दृश्य आणि आंतरनाद…
एक मान थोडीशी झुकलेली,
खांद्यावर विसावलेली तिसऱ्याची समजूत…
एका फ्लॅशने टिपलेलं, एक जिंकलेलं हास्य…
आणि त्या क्षणाच्या पाठी,
गर्दीत कुठेतरी अस्पष्ट उभी राहिलेली,
एका (पि)त्याची सावली…
बाहेरच्या गजरात स्वागत होत होतं…
आतल्या शांततेत —
एक हळूहळू, पण अगदी जिवंत असं नातं, काळजाच्या गाभ्यात मरण पावत होतं.
त्याला नातं हरवणं नवं नव्हतं…
पण…
स्वतःचं ओळखीचं हरवणं — हे अगदीच अनोळखी होतं.
कधी एक विश्वास होता –
की हे घर, ही आठवण, ही साथ कधीतरी पुन्हा त्याच्याकडे वळेल…
पण त्या दिवशी,
त्याचं प्रत्येक का
एका खुळखुळत्या होणारच या निर्धारासमोर मूक झाला…
🌑 मनःशिल्पाचा शेवट…
हसणं पसरत होतं…
कॅमेरे टिपत होते…
आणि त्याच्या मुठी मात्र —
हळूहळू घट्ट होत होत्या…
हा क्षण —
साजरा होणारा सोहळा नव्हता…
हा एका विश्वासाचा संथ, पण सजीव
शेवटचा विधी होता…
तो उभा होता…
पण तो तिथं नव्हताच…

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा