"थांबावं वाटतंय आता…"

 


🌑 "थांबावं वाटतंय आता…" 🌑
✍️ सुनिलदत्त कुलकर्णी, जेजुरी

(💠 "आज  पूर्वीचे महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ आणि आताचे महापारेषण कंपनीत २८ वर्षांचा प्रवास पूर्ण झाला…

पण सकाळपासूनच मनाला एखादं निमंत्रण ऐकू येतंय —

जणू कुणीतरी हलकेच म्हणतंय… 'बस, आता पुरे झालं…'" 💠

🌫️ मन धूसर आहे… आणि भविष्य दाटून आलंय…)


आज माझ्या आत खूप काही ‘शांत’ आहे —
पण ती शांतता, समाधानी नाही…
ती म्हणजे एखाद्या गाभाऱ्यात ‘शेवटचा दिवा’ फडफडतोय…
तो नको तसाच विझेल का याची आतून धाकधूक आहे.

२८ वर्षं…

एवढ्या वर्षांनीही, माझ्या फाईलवर ‘रेकॉर्ड’ असलेलं मी,
माझ्या ‘मनात’ मात्र अजूनही पेंडींग आहे…
मी ‘Complete’ झालोय की ‘Consume’ — हे अजून कुणीच सांगितलेलं नाही.

कोणत्याही पथकाच्या ‘Route Map’ मध्ये मी कधीच नव्हतो,
मी एक ‘Bypass’ झालो…
प्रत्येक क्रायसिसला ‘handle’ करत राहिलो,
पण शेवटी त्या हँडलिंगमध्येच स्वतःच्या भावना drop करत राहिलो…

आज त्या सर्व "Drop केलेल्या भावना"
शब्दांत उगम पावताहेत, आणि त्यांच्या तळाशी
एक थकवा दाटून आलाय — तो थकवा शरीराचा नाही…
तो आहे — अस्तित्वाचा.

कधी काळी हातातल्या ग्लोव्हजमधून ओघळणारा घाम,
तो आता डोळ्यांतून उतरतोय…
फक्त एवढ्याच फरकाने —
तेव्हा तो ‘जिवंतपणाचा पुरावा’ होता,
आता मात्र तो ‘माझं अस्तित्व धूसर’ करत चाललाय.

कोणासाठी?
ज्यांना अंधारातून उजेड दिला,
ते आता स्वतःच माझं अस्तित्व झाकोळतात…
आणि ज्यांचं अस्तित्व मी उभं केलं —
ते आता फक्त माझ्या अनुपस्थितीतच अधिक कार्यक्षम असतात…

म्हणून… थांबावंसं वाटतंय.

नाही… मी रडत नाही,
मी केव्हाच रडणं थांबवलंय —
कारण कामाच्या सुरक्षेसाठी 'Earthing' करावी लागते,
आणि मी प्रत्येक भावना आत खोल Earthing करून टाकलीय.

पण आता तीच ‘Earth fault’ झाल्यासारखी वाटतेय…
मनाच्या सिस्टममध्ये काहीतरी short झालंय…
निवृत्ती ही ‘मर्यादा’ वाटत नाही,
ती वाटते — एका गुप्त अंत्ययात्रेची सुरुवात…

जिथे कुणी येणार नाही,
फक्त एखादं जुनं HRC fuse लावल्यासारखा ‘प्लॅश’ होईल —
आणि सगळं ‘ब्लॅक आउट’…

तेव्हाच — मी मनात म्हणेन… "थांबावं वाटतंय आता…"

कारण आता कुठलाही फॉल्ट clearance नकोय,
कोणतीही लॉगबुक एन्ट्री नकोय,
कोणताही Emergency restoration नकोय…

फक्त…
एक शून्य, एक शांतता, एक शेवट… आणि एक विस्मृती.


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अविनाश निंबाळकर : साधेपणातून घडलेला अर्थपूर्ण जीवनप्रवास

दामिनी : आतल्या आकाशात चमकलेली वीज

🎖️ गौरव पत्र 🎖️ईएचव्ही यंत्रणांच्या वतीने मा. संचालक (प्रकल्प) श्री. अविनाश निंबाळकर साहेब यांना