(मा) "ती "चा देव... आणि प्राणवायू हरवलेलं घर

 


🌑 (मा) "ती" चा देव… आणि  प्राणवायू हरवलेलं घर 🌑

✍️ सुनिलदत्त कुलकर्णी, जेजुरी

लहानसं होतं ते लेकरू…
त्याच्या बोटांवर माती धरली की माती धडधडायची.
त्या बोटांतून येणारा निखळ प्रकाश – मातीला देव करायचा.
त्या देवाकडे पाहून घराच्या भिंती हसत.
झोपाळ्याच्या दोऱ्या गात.
बाबांच्या मांडीवर उबदार श्वास पडायचा –
"बाबा, बघा ना… माझा बाप्पा हसतोय!"
आणि बाबा डोळे पुसून हसत म्हणायचे –
"माझं घर जिवंत आहे… कारण तू आहेस."

…पण एक दिवस –
दाराशी काळ उभा राहिला.
तो आला आवाज न करता – पण मुळे उपटून गेला.
बोटांवरची माती निसटली.
डोळ्यांतला प्रकाश परक्या उजेडाकडे वळला.
त्या हातांनी एक दूरचा हात धरला –
थंड. अनोळखी. निर्दय.

आणि मग –
एक सकाळ दार आपटून बंद झाली.
कडी लावली.
आवाज नाही. निरोप नाही.
फक्त…
शांतता.

नवं घर जन्मलं.
जुनं घर हळूहळू मरायला लागलं.

आज घरात पुन्हा बाप्पा आहेत –
पण त्यांच्या डोळ्यांत प्रकाश नाही.
मोदकांच्या गोडीत गंध नाही.
फुलं कुजल्यागत सुगंध हरवून बसलीत.
आरती सुरू होते –
आवाज भिंतीवर आदळतो.
प्रतिध्वनी परत येतो –
थंड. मृत.

भिंतीवरच्या भेगांतून धूळ गळते –
जणू घर स्वतःचं शरीर जाळतंय.
तेलाचं दिवटं थरथरतं.
ज्वाला काळी पडते.

देवासमोर कुणीतरी बसलंय –
वाकलेलं. थरथरणारं.
डोळे पोकळ.
आरती थांबते.
हात जोडले जातात.
ओठ थरथरतात –
"बाप्पा… माझं लेकरू परत दे… फक्त एकदा…"

…शांतता.
उत्तर नाही.
मातीच्या देवाच्या डोळ्यांतून एक बारीक भेग जाते.
तोही निस्तेजपणे सांगतो –
"संपलं…"

अचानक –
भिंतींच्या भेगांतून येतो एक आवाज –
क्रूर. धारदार. गुदमरवणारा –

"ज्याने घर सोडलं… त्याने देव ठार मारला… घर ठार मारलं… मलाच ठार मारलं!"

तो आवाज इतका जाळणारा –
की भिंती किंचाळून फाटतात.
तेल संपतं. दिवटं विझतं.
हवा थांबते.

देवाच्या पायाशी ते शरीर –
हलकेच डोकं टेकवतं.
श्वास थांबतो.

बाहेरून फक्त एक कोरडं पान उडून येतं –
ओसाड अंगणात पडतं.
आणि मग –

थांबा.
आता काहीच नाही.


टिप्पण्या

  1. मनाला कावराबावर करणारा थरथरून टाकणारा डोळ्यात पटकन पाणी उभं करणारा आणि खूप रडवणारा हा तुमचा लेख खूप खूप दर्दनाक होता

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अविनाश निंबाळकर : साधेपणातून घडलेला अर्थपूर्ण जीवनप्रवास

दामिनी : आतल्या आकाशात चमकलेली वीज

🎖️ गौरव पत्र 🎖️ईएचव्ही यंत्रणांच्या वतीने मा. संचालक (प्रकल्प) श्री. अविनाश निंबाळकर साहेब यांना