अश्रूंचं अधुरं गाणं

अश्रूंचं अधुरं गाणं

ताल हरवला की जीवन केवळ वेदना ठरते

✍️ सुनिलदत्त कुलकर्णी, जेजुरी

विरहाचा अव्यक्त गहिरा स्वर…

जीवन कधी कधी अशा गाण्यासारखं होतं, ज्यात स्वर आहेत पण श्वास नाही, ओळी आहेत पण लय नाही. हृदय धडधडतं, पण जिवंतपणाचं भान विरून जातं.

आपण संपूर्ण सामर्थ्याने उभे असतो, तरीही काळ एकाएकी पोकळ करून टाकतो. जणू नाजूक काडीला वादळानं चिरडून टाकावं तसं जगणं मोडून कोसळतं. आपल्या हातात काहीच राहत नाही—आणि ज्या क्षणी आपल्या अस्तित्वाला सर्वाधिक आधार हवा असतो, त्या क्षणी आपणच सर्वाधिक असहाय्य उभे आहोत, असं जाणवतं.

मानवी मनाला वेदनेचा जसा एक कळस असतो, तसा तो दिवस नकळत येतो. कुणी आपलं, कुणी जिव्हाळ्याचं, कुणी अगदी अंतःकरणाला भिडणारं—कोणीतरी दूर जातं. देह नजरेतून नाहीसा होणं सहन करता येतं, पण नातं अंतःकरणातून दुरावणं ही काळजाला फाडून टाकणारी जखम असते. कारण जेव्हा ओळखीच्या सावल्या डोळ्यांना दिसेनाशा होतात, तेव्हा हृदयावर न सांगता येणारं काळं दाटून येतं.

जीवनाच्या वाटेवर माणूस जरी कणखर असला तरी काही प्रसंग असे असतात की जिथे शक्ती नुसती उरते—पण व्यर्थ ठरते. वेळ हातून निसटतो, नाती डोळ्यांआड जातात, आणि आपण फक्त दोन पोकळ हातांनी मूक प्रेक्षक बनून उभे राहतो.

हातातल्या वाळूसारखं हे जगणं… घट्ट पकडायचं म्हटलं तरी बोटांतून निसटून जातं. काही कण अजून हातात उरतात, काही गळ्याला टेकतात, पण बाकी सगळं जमिनीत मुरून हरवतं. अगदी तसंच—आयुष्याच्या मूठीत धरलेलं सारं, एका क्षणात विरून जातं.

आणि उरतो तो फक्त विरहाचा अव्यक्त गहिरा स्वर—ज्याला शब्द नाहीत, ज्याला ताल नाही, तरी ज्याचा प्रतिध्वनी मनाच्या गर्भात जन्मोजन्मी घुमत राहतो…

आणि त्या स्वराचं ऐकणं हीच जगण्याची शिक्षा ठरते.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अविनाश निंबाळकर : साधेपणातून घडलेला अर्थपूर्ण जीवनप्रवास

दामिनी : आतल्या आकाशात चमकलेली वीज

🎖️ गौरव पत्र 🎖️ईएचव्ही यंत्रणांच्या वतीने मा. संचालक (प्रकल्प) श्री. अविनाश निंबाळकर साहेब यांना