तू ठीक आहेस ना?

 


तू ठीक आहेस ना?- 

✍️ सुनिलदत्त कुलकर्णी, जेजुरी

कोरड्या शब्दांचं गूढ

जीवनात कधी कधी अशी वळणं येतात की शब्दच हरवून जातात.
ज्या मनाला लहानशा गोष्टींनी पाणी यायचं, तेच मन अचानक वाळवंटासारखं कोरडं—कडक—कडवट होतं.
एकेकाळी फुलपाखरांच्या रंगांत न्हालेलं आयुष्य, एका क्षणात काटेरी झुडपांत फेकलं जातं. उमेद शरमते, हास्य मागे सरकतं, आणि हृदयाचा झरा आटतो.

पूर्वी प्रश्नांमध्येही गोडवा असायचा—
“हा रंग कोणत्या रंगात मिसळून तयार झाला असेल?”
आज तोच प्रश्न विषासारखा छातीत घाव घालतो—
“हे का घडलं?”
उत्तर हाताशी नाही. जणू आयुष्याने आपल्याकडून सोपी कोडी हिसकावून घेतलीत, आणि त्याजागी न सुटणारं गूढाचा जड ग्रंथ ठेवला आहे.

मन खरं तर पावसासारखं असतं.
कधी टिपूर बरसतं, कधी शांतपणे अंगण भिजवतं.
पण वादळानं दिशा मोडली, की ढगांत फक्त वीजांचा गडगडाट उरतो—थेंब मात्र फुटत नाहीत.
तोच कोरडेपणा आत्म्याला झिजवतो.

याक्षणी मनाला हवी आहे फक्त एकच ओल—
चार अक्षरी साधं वाक्य:
तू ठीक आहेस ना ?
तेही नसेल, तर हृदय खरंच पाषाण होतं.

खरं गूढ इतकंच—
ज्यांच्या डोळ्यांतून कधी निरागसतेनं पावसासारखे प्रश्न झरत होते,
त्याच डोळ्यांत आता एक न सुटणारं गूढ ठाण मांडून बसलंय…
आणि आपलं जगणं त्या गूढाच्या उत्तराच्या शोधातच वाहून जातं.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अविनाश निंबाळकर : साधेपणातून घडलेला अर्थपूर्ण जीवनप्रवास

दामिनी : आतल्या आकाशात चमकलेली वीज

🎖️ गौरव पत्र 🎖️ईएचव्ही यंत्रणांच्या वतीने मा. संचालक (प्रकल्प) श्री. अविनाश निंबाळकर साहेब यांना