"कधी न बोललेली… पण काळजात साठलेली गोष्ट!"

 


🌿 "कधी न बोललेली… पण काळजात साठलेली गोष्ट!" 🌿

✍️ सुनिलदत्त कुलकर्णी, जेजुरी

शब्दांचे काही प्रकार फार वेदनादायक असतात…

ते उच्चारले जात नाहीत — फक्त गिळावे लागतात.

कारण आपल्याच लोकांना दुखवायचं नसतं.

पण नेमकं तेच "आपले लोक"…

कधी कधी आपल्या काळजात अशा खोल जखमा सोडून जातात —

ज्या ‘न बोललेल्याच’ राहतात…

माणसाने प्रेम करावं… नक्कीच करावं!

पण ते इतकं आंधळं नसावं,

की त्याच्या नादात माणसानं आपल्या मुळाशी असलेल्या मूल्यांना,

आयुष्यभर जपलेल्या नात्यांना

आणि विश्वासाच्या आधारालाच दुर्लक्षित करावं…

आजची पिढी "मनापासून जगण्याच्या" विचारांनी भारलेली आहे…

पण खरंच — मनापासून जगणं म्हणजे काय?

ज्यांनी आपल्याला चालायला शिकवलं, वाढवलं, घडवलं…

त्यांचं मन तोडून आपलं मन जपणं —

हाच का स्वातंत्र्याचा अर्थ?

एक शाळेतील प्रसंग आठवतो…

शाळेतील एका विद्यार्थिनीने गुरुजींना विचारलं,

“गुरुजी, तुम्ही फुलदाणीत नेहमी जास्वंदाचंच फूल का ठेवता?”

गुरुजी हसले आणि म्हणाले,

“कारण मला जास्वंद आवडतो.”

ती पुन्हा म्हणाली, “पण तुम्हाला गुलाबही आवडतो ना?”

गुरुजी शांत हसत म्हणाले —

“हो! गुलाब सुंदर आहे… पण त्याच्या काट्यांनी

माझ्या दाराशी येणाऱ्यांच्या पायाला इजा होऊ शकते.

म्हणून गुलाब मी बागेत ठेवतो — दारात नाही.”

प्रेम हे गुलाबासारखं असू शकतं — मोहक, सुगंधी…

पण इतरांसाठी कधी कधी वेदनादायक.

तर जबाबदारी ही जास्वंदासारखी —

साधी, शिस्तबद्ध, आणि सर्वांच्या जाणीवेला स्पर्श करणारी.

आणि आज…

कुठेतरी, कधीकाळी आपल्या पाठीवरून हात फिरवणाऱ्या

आप्तस्वकीयांच्या डोळ्यांतून ओघळणारे अश्रू असतील —

ते रागाचे नसतील… उपेक्षेचेही नसतील…

ते असतील — एकटेपणाचे अश्रू…

आपल्यावरच्या अपरिमित प्रेमाने भरलेले,

पण आपल्या निर्णयांनी पोळलेले.

प्रेमाने नातं जोडलं जातं…

पण शहाणपणाच्या धाग्यानेच ते टिकतं…

आपण खूप काही मिळवतो —

पदवी, प्रतिष्ठा, पैसा…

पण नकळत आपल्या ‘लोकां’चा विश्वास हरवतो…

आणि त्या हरवलेल्या नजरेत

एक खोल वेगळेपण, एक असहाय हतबलता दडलेली असते…

आपली निवड जर आपल्या माणसांच्या हृदयावर बेतत असेल

तर ती "निवड" नसते…

ती एक भावनिक चूक असते… एक घातक हट्ट!

कधी कधी आपण इतके पुढे जातो

की मागे राहिलेली माणसं परकी वाटू लागतात…

पण त्या ‘परक्या’ वाटणाऱ्या माणसांनीच

आपल्याला उभं राहायला शिकवलं होतं…

त्यांच्या नकारात घृणा नव्हती — अनुभव होता,

त्यांच्या विरोधात राग नव्हता — जबाबदारी होती,

आणि त्यांच्या शांततेत विसर नव्हता —

एक खोल, असहाय अशांतता होती…

नातं तुटत नाही… पण अर्थ हरवतो…

आणि मग…

माणसं जिवंत असूनही… त्यांच्या डोळ्यांतलं ‘आपलेपण’ हरवलेलं वाटतं…

"प्रेम करण्याआधी इतकंच लक्षात ठेवा —

तुमचं आयुष्य तुमचं असेल, पण…

तुमच्या एका निर्णयाने कुणाचं अख्खं भावविश्व कोसळू शकतं!"

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अविनाश निंबाळकर : साधेपणातून घडलेला अर्थपूर्ण जीवनप्रवास

दामिनी : आतल्या आकाशात चमकलेली वीज

🎖️ गौरव पत्र 🎖️ईएचव्ही यंत्रणांच्या वतीने मा. संचालक (प्रकल्प) श्री. अविनाश निंबाळकर साहेब यांना