*थकलेल्या बापाचं पोराला पत्र*
*थकलेल्या बापाचं पोराला पत्र*
प्रिय बाळा,
हे पत्र वाचताना कदाचित तुझा किमती वेळ वाया जाईल, पण माझं मन खूप भरून आलंय म्हणून लिहितोय.
मी थकलोय रे... पण हरलो नाही.
माझ्या डोळ्याखालची काळी वर्तुळं, कमरेचं झुकणं, आणि पाठीवरचा ओझ्याचा वळसा तुला कदाचित थोडा हास्यास्पद वाटेल... पण हे वळसे एका घरासाठी झेललेत, त्या घरासाठी जे अजूनही उभं आहे – कारण मी हरलो नाही.
मुलांपुढे कधीच थकलो असल्याचं दाखवायचं नसतं, हे मला माझ्या वडिलांनी शिकवलं.
ते सुद्धा तसेच जगत आहेत, नि आता मी जगतोय
हरायचं नसतं कारण मी जर हरलो, तर सगळं कोसळतं – तुझं शिक्षण, तुझं स्वप्न, तुझं भविष्य… आणि आपल्या आईचं आयुष्य.
पण एक सांगू का?
कधी कधी वाटतं – एखाद्या संध्याकाळी तुझ्या खांद्यावर डोकं ठेवून मोकळं रडावं... सांगावं, “बाळा, थकलोय रे, थोडा वेळ मला तुझा आधार दे.”
पण तसं करणं बापाला परवडत नाही.
बाप थकल्याचं, दमल्याचं, माणूस असल्याचं सांगूच शकत नाही...
फक्त हेच सांगायचंय –
आज तू दूर आहेस, कदाचित व्यस्तही… पण लक्षात ठेव,
एक माणूस आहे जो तुझ्यासाठी दररोज थकत राहतो, पण हरत नाही.
कारण तो तुझ्या पाठीशी 'घर' म्हणून उभा आहे.
कधी वेळ मिळाला, तर फक्त एवढं कर —
एक फोन कर, आणि फक्त इतकंच सांग,
"बाबा, मी समजतो… थकलायत ना?"
मग कदाचित मीही म्हणेन,
"हो रे पोरा… पण तुझ्या आवाजाने परत ताकद आली."
– तुझा थकलेला पण अजूनही न हरलेला
बाबा.
©सुनिलदत्त दि. ०४.०६.२०२५
All reactions:कुलकर्णी
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा