अलक संच : मातीचा देव

 


अलक संच : मातीचा देव

✍️ सुनिलदत्त कुलकर्णी, जेजुरी

अलक – १
लहानपणी मातीला देव बनवणारी ती बोटं…
आज कुणाच्या तरी हातात हरवली.
घरात देव बसलाय,
पण देव मेला आहे –
आणि घरही.


अलक – २
एके काळी हशाने भरलेलं घर…
आज आरतीतही शांतता.
गणपती आहे, पण उत्सव हरवलाय –
त्याच्यासोबत… तेही.


अलक – ३
मातीच्या देवाला प्राण देणारा श्वास
आज कुणा परक्या अंगणात वसतोय.
इथं?
देव शिल्लक… पण देवपण नाही.


अलक – ४
त्या पावलांनी कधीकाळी अंगण फुलवलं होतं.
आज तीच पावलं परक्या वाटेवर आहेत.
इथं?
अंगण कोमेजलंय… आणि मनही.


अलक – ५
गणपतीच्या आरतीनंतर कुजबुज –
"येऊन जा ग… एकदाच येऊन जा…".
भिंतींनी ऐकलं.
देवानेही.
पण प्रतिध्वनी सोडून काही आलं नाही.


अलक – ६
कधीकाळी या हातांनी देवाला डोळे दिले होते.
आज तेच डोळे देवाकडे पाहायलाही परत येत नाहीत.


अलक – ७
आरतीचा दिवा पेटला,
पण ज्याच्या प्रकाशाने घर उजळायचं –
तो श्वास आज परक्या अंधारात आहे.


अलक – ८
भिंतींच्या आत अजूनही "बाप्पा मोरया" घुमतंय,
पण त्या आवाजात आता गोडवा नाही –
फक्त विरहाची राख आहे.


अलक – ९
देव विसर्जनाला गेला,
पण अंगणात रडणारा कोणी नव्हता.
जणू घर नव्हतं…
फक्त थडगं उरलं होतं.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अविनाश निंबाळकर : साधेपणातून घडलेला अर्थपूर्ण जीवनप्रवास

दामिनी : आतल्या आकाशात चमकलेली वीज

🎖️ गौरव पत्र 🎖️ईएचव्ही यंत्रणांच्या वतीने मा. संचालक (प्रकल्प) श्री. अविनाश निंबाळकर साहेब यांना