रक्ताचं नातं, मनाचं ओझं | बापलेकीचं नातं आणि जीवनाचं गमक – हृदयस्पर्शी मराठी लेख
रक्ताचं नातं, मनाचं ओझं
✍️ सुनिलदत्त कुलकर्णी, जेजुरी
घरात पहिल्यांदा पाळण्यात बाळ आलं, तेव्हा वाटलं— “फुलपाखरं अंगणात उतरलीत की काय!” नवं बाळ म्हणजे केवळ एक जीव नव्हे, तर पिढ्यांचा वारसा जणू एका क्षणात आकार घेतलेला.
स्वतःचं अपत्य नसतानाही, त्या नव्या जीवाला हातात उचलणं— हे बाप होण्याच्या सुखाच्या अगदी शेजारी उभं असलेलं एक वेगळंच दार होतं.
कधी डोक्यावर उचलतो, कधी खांद्यावर बसवतो, कधी हात धरून चालायला शिकवतो… आणि नकळत आपण अधुरे बाप बनून जातो.
हसण्यात लपलेली ओल, कौतुकात दडलेली जबाबदारी, आणि प्रेमामागे शांतपणे थडकणारी काळजी— हे सगळं नकळत मनात घर करून राहतं.
पण काळाचा काय? तो तर फक्त चालतो. बालपणातून तारुण्य जन्म घेतं, आणि मग एक दिवस तोच जीव स्वतःचे निर्णय घेतो. तेव्हा मनाच्या जखमा उघड्या पडतात.
“बाळाचं पहिलं पाऊल त्याला चालायला शिकवतं, पण आयुष्याचं पहिलं पाऊल पालकांना पांगळं करून जातं.” —हे ऐकलं होतं कधीतरी… आज अगदी जगून उमजतं.
आपण ज्याला डोळ्यांत जपलं, हातात सांभाळलं, स्वप्नांत उभं केलं— तो जर वेगळा मार्ग निवडतो, तर ती फक्त त्याची पावलं नसतात; आपल्या हृदयावर उमटलेले ठसे असतात.
नात्याचं खरं सौंदर्य हे असण्यात नसतं, तर सोबत राहण्यात असतं. आणि ती साथ अर्धवट तुटली, की मनात एक कायमची पोकळी घर करते.
गावच्या वडिलोपार्जित वडासारखं— त्याच्या फांद्यांवर घरटी, घरट्यांत पिल्लं, आणि मग एक दिवस ती उडून जातात… झाडाची सावली तशीच राहते, पण किलबिल हरवते. झाड जळून जात नाही, पण आतून मात्र कोरडं होतं.
जीवनाचं गमक एवढंच— आपण कुणाला कितीही जवळ केलं, तरी शेवटी तो त्याचा प्रवास निवडतोच. आणि आपण? आपण केवळ साक्षीदार बनून राहतो, हृदयातलं सुख आणि वेदना दोन्ही जपून.
“नातं हे जन्माने घट्ट होतं, पण निर्णयाने ढासळतं.” हो, हे खरं आहे. पण तरीही आठवणी कोणत्याही निर्णयावर अवलंबून नसतात. त्या मनाच्या कोपऱ्यात कायमची किलबिल करत राहतात— नातं हरवलं तरी त्याच्या सावलीतलं ऊन उरलेलं असतं. 🌿

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा