तुटलेल्या पंखांचं उड्डाण…

तुटलेल्या पंखांचं उड्डाण…

✍️ सुनिलदत्त कुलकर्णी, जेजुरी

घर म्हणजे चार भिंती नाहीत, वीट–वाळू–सिमेंटचा चौकोन नाही. घर म्हणजे श्वासांचा एक लयबद्ध प्रवाह, विश्वासांच्या विणलेल्या जाळ्याचं आसमंत, आणि भावनांच्या असंख्य धाग्यांनी गुंफलेलं हृदयाचं गाठोडं.

प्रत्येक ओसरीवर साठलेली पावलांची चाहूल, प्रत्येक खिडकीतून दिसणारा आठवणींचा क्षितिजावरचा तुकडा, आणि प्रत्येक कोपऱ्यात सांडलेला आनंदाचा किंवा दु:खाचा आवाज—हेच तर घराला जिवंत ठेवतात.

मुलं म्हणजे त्या घराच्या अंगणात जपून पेरलेली कळी. आईच्या उबदार मायेच्या पाण्यानं, बापाच्या सावलीसारख्या संरक्षणानं ती कळी वाढते. काट्यांचा भेद तिच्यापर्यंत पोहोचू नये म्हणून कितीतरी झाडं आपण स्वतः काटेरी बनून झेलतो. सूर्याची जाळणारी किरणं तिच्या कोवळ्या पानांवर पडू नयेत म्हणून आपण छत्र बनून उभे राहतो.

आणि मग एक दिवस येतो—ती कळी उमलते. उमलणं हा निसर्गाचा नियम असतो; पण ती उमलते आपल्या जपलेल्या बागेत नव्हे, तर परक्या वाटेवर. त्या उमलण्याचा आनंद क्षणभर वाटतो, पण लगेच मनावर एक अज्ञात भेद उमटतो—ही फुलं आता या अंगणाची राहिली नाहीत.

पालकत्व म्हणजे एक दीर्घ शिल्पकला आहे. आपण मातीच्या गुठळ्याला आकार देतो, प्रत्येक रेषेत आपला श्वास मिसळतो, प्रत्येक वळणावर आपल्या ममतेचा ठसा उमटवतो. शिल्पकार जेव्हा मूर्तीला जीवदान देतो, तेव्हा तिच्या डोळ्यात जिव्हाळा आणतो, तिच्या हास्यात दैवी तेज देतो.

आणि मग—एका क्षणात कुणीतरी येतं, आणि त्या मूर्तीचं मुख बदलून टाकतं. मूर्ती उभी राहते खरी, पण शिल्पकाराचं अंतःकरण तुटतं. त्याच्या हातातील ओढ, त्याच्या मनातला अभिमान, त्याच्या डोळ्यातला चमकता किरण—सगळं एका क्षणात नष्ट होतं.

पालक जेव्हा मुलांच्या मनात मूल्यांची बीजं पेरतात, संस्कारांची पानं लावतात, तेव्हा त्यांना खात्री असते—ही झाडं आयुष्याच्या वादळातही डळमळणार नाहीत. पण जेव्हा तेच स्तंभ डळमळतात, तेव्हा मनाचं छत कोसळल्यासारखं होतं.

ही जखम बाहेरून दिसत नाही. कुठलाही टाका

, कुठलंही रक्त तिचं दर्शन घडवत नाही. पण आतून सतत गळणाऱ्या या वेदनेनं मन हळूहळू कोरडं, पोकळ, उध्वस्त होतं.

बाहेरून आपण चेहऱ्यावर हसू ठेवतो, जगाला दाखवण्यासाठी आनंदाचा अभिनय करतो. पण डोळ्यांच्या तळाशी वाहणारा निःशब्द प्रवाह कुणीच थांबवू शकत नाही. डोळ्यांतून पडलेला एक थेंब, मनाच्या वाळवंटातल्या अथांग नदीसारखा वाहत राहतो.

ही केवळ एका घराची कहाणी नाही. ही त्या प्रत्येक आई-वडिलांची जाणीव आहे, ज्यांनी आपलं सगळं आयुष्य मुलांच्या भविष्यासाठी खर्च केलं, संस्कारांच्या पेरणीत स्वतःला झिजवलं, आणि तरीही अंतःकरणाचं तुटणं अनुभवावं लागलं.

कारण शेवटी—

“पंख फुटणं ही निसर्गाची देणं असतं;

पण त्या पंखांनी घरट्याच्या दिशेनं परतावं,

की परक्या आकाशात हरवावं,

हा निर्णय घेताना मात्र असंख्य हृदयं तुटतात.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अविनाश निंबाळकर : साधेपणातून घडलेला अर्थपूर्ण जीवनप्रवास

दामिनी : आतल्या आकाशात चमकलेली वीज

🎖️ गौरव पत्र 🎖️ईएचव्ही यंत्रणांच्या वतीने मा. संचालक (प्रकल्प) श्री. अविनाश निंबाळकर साहेब यांना