(सोड) चिठ्ठी
(सोड) चिठ्ठी
✍️ सुनिलदत्त कुलकर्णी, जेजुरी
डिस्क्लेमर :
हे मनोगत एका व्यक्तीचे नाही. प्रत्येक कार्यालयात, प्रत्येक कंपनीत, प्रत्येक घरात – जिथे मनावर जबाबदाऱ्यांचे ओझे वाढते, जिथे थकवा नि:शब्दपणे आतून कुरतडतो, जिथे शांततेसाठी मन हळूच हाक मारते – तिथल्या असंख्य मनांचे हे शब्द आहेत. वाचताना जर डोळे पाणावले, छातीत कळ आली किंवा न सांगता येणारे शब्द मनात हलले – तर समजा, आपण एकटे नाही. ही सामूहिक वेदनेची भाषा आहे.
दिनांक : १३.०९.२०२५
प्रति,
माझ्या सहकाऱ्यांना, माझ्या कंपनीला, आणि प्रत्येक थकलेल्या मनाला,
सप्रेम नमस्कार,
संध्याकाळ होत आली की जशी दिवसाच्या धावपळीने थकलेल्या आकाशावर संधिप्रकाशाची करडी चादर पसरते, तशीच थकलेल्या मनावरही न सांगता येणाऱ्या विचारांची छाया पडते.
मी हे पत्र लिहिताना त्याच छायेखाली बसलो आहे – मन जड झाले आहे, आठवणी डोळ्यांत दाटून आल्या आहेत, आणि शब्दांचा ओघ थांबत नाही आहे.
ही कंपनी – आपली कार्यभूमी – जणू एक विशाल वटवृक्षच आहे.
त्याच्या फांद्यांवर आपण स्वप्ने बांधली, त्याच्या सावलीत काम करत राहिलो,
त्याच्या खोडावर हात ठेवून सहकाऱ्यांचे दुःख ऐकले, आनंद शेअर केला.
पण काही वेळा त्या झाडालाही थकवा जाणवतो…
कधीतरी त्याच्या फांद्यांवरून पानं झडतात, आणि मन विचारते –
“मी अजून किती काळ स्वतःला झिजवत राहू?”
(मनाशी संवाद)
– “सगळं सुरळीत चाललंय ना?”
– “हो… बाहेरून…”
– “आणि आत?”
– “रिकामं… आवाजही नाही…”
– “मग?”
– “थांबून श्वास घेऊ का?”
– “हो… तेच खरं…”
(थकलेल्या मनाची कुजबुज)
किती दिवस
फक्त कामाच्या ओघात वाहत राहिलो
किती रात्री
मनाचे दरवाजे बंद करून झोपलो
किती वेळा
शब्दांपूर्वी अश्रू बोलले
आणि तरीही
हसू चेहऱ्यावर ठेवले…
आज मन म्हणते –
‘थांब जरा… स्वतःला ऐक…’
कधी कधी आपण स्वतःलाच विसरून जातो.
पद मोठे असो वा लहान, मान्यता मिळो वा न मिळो –
मनाच्या थकव्याला मात्र हे काही फरक पडत नाही.
त्याला फक्त श्वास हवा असतो.
त्याला फक्त स्वतःला वेळ द्यायचा असतो.
त्याला फक्त म्हणायचं असतं – “मी आहे… मला विसरू नका…”
आईला दिलेले वचन पूर्ण करू शकलो नाही याची मनात वेदना आहे.
पण वचनांपेक्षा मनाची शांती मोठी असते – हे आता स्पष्ट झाले आहे.
कोणावरही राग नाही, कुणाविषयी कटुता नाही…
फक्त स्वतःला थोडा वेळ हवा आहे –
श्वास मोकळा घेण्यासाठी, मनाला थांबून ऐकण्यासाठी.
मन म्हणजे सतत वाहणारी नदी…
कधी शांत, कधी वेगवान…
कधी लाटांनी किनारे खचवणारी, कधी वाळलेल्या ओढ्यासारखी.
ते थकते, अडखळते… आणि एका टप्प्यावर थांबते.
तेव्हा तिच्या किनाऱ्यावर एक छोटीशी दगडी बेंच असतो–
जिथे बसून ती नदी स्वतःला विचारते –
“आता पुढे कसं जावं?”
तेच माझ्या मनाचं दृश्य आहे.
आठवणींची उजळणी
सहकाऱ्यांच्या हसण्याचे आवाज अजून कानात घुमतात…
कार्यालयातील खोलीतल्या चर्चा अजून मनात जिवंत आहेत…
एकमेकांचे खांदे, हातातील आधार, वेळोवेळी मिळालेली समजूत –
हे सारे आजही माझ्या मनात उजळत आहे.
माझ्या जाण्याने कंपनीला फारसा फरक पडणार नाही, हे मला ठाऊक आहे…
पण प्रत्येकाच्या मनात अशीच वेदना असते, हे मला जाणवत आहे.
म्हणूनच हे मनोगत लिहित आहे –
ज्या कोणाच्या मनात थकवा दाटून आला आहे त्याला सांगण्यासाठी –
“तू एकटा नाहीस… तुझ्या मनाचा आवाज ऐक… त्यातच तुझं खरं बळ आहे.”
– “तुला थांबावं वाटतं?”
– “हो… कारण मी थकलेलो आहे…”
– “लोक काय म्हणतील?”
– “लोक नाही… माझं मन काय म्हणतंय ते महत्त्वाचं…”
– “मग जा… पण प्रेमाने जा…”
जिथे शब्द थांबले
तिथे अश्रू बोलले
जिथे जबाबदाऱ्यांनी मन दडपले
तिथे शांततेने हळूच दरवाजा उघडला
आणि मन कुजबुजले –
‘जरा थांब… श्वास घे… स्वतःला परत भेट…’
हे पत्र कुणाच्याही मनातील अस्वस्थतेला शब्द देण्यासाठी आहे.
आपण जिथे असाल, कोणतेही काम करत असाल –
जर थकवा जाणवत असेल, मनावर दडपण असले, किंवा स्वतःपासून दूर गेल्यासारखे वाटत असेल –
तर जाणून घ्या – हे शब्द तुमच्यासाठी आहेत.
आपल्या सर्वांच्या मनःशांतीसाठी, धैर्यासाठी आणि स्वतःकडे वळण्याच्या प्रवासासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.
आपलाच,
एक सहकारी, एक कर्मचारी, एक थकलेले पण जिवंत मन

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा