कार्यालयीन महाभारत : आधुनिक शुक्राचार्य आणि त्यांचे पुराणसखेसोबती

 

कार्यालयीन महाभारत : आधुनिक शुक्राचार्य आणि त्यांचे पुराणसखेसोबती

✍️ सुनिलदत्त कुलकर्णी, जेजुरी

कार्यालय ही जागा म्हणजे “काम करण्याचं ठिकाण” असं आपण समजतो.

पण खरी ओळख काय?

ही जागा म्हणजे काम अडवण्याचं राष्ट्रीय विद्यापीठ!

आणि इथले प्राध्यापक कोण?

तर तेच—

आधुनिक झारीतील शुक्राचार्य!

फाईल जर त्यांच्या टेबलावर येऊन बसली, तर तिचा प्रवास “रेल्वे गाडी” नसून “महाभारताचं युद्ध” ठरतो.

फाईलमध्ये काही महत्त्वाचं आहे का नाही—याला काही किंमतच नाही.

पण स्वल्पविराम उलटा आहे का, सहीतली शाई जास्त आहे का, पानाच्या कोपऱ्याला गोंद पडलाय का—

यावर मात्र महासभा रंगते.

“काम पूर्ण करायचं” हे या धर्मसंस्थेत अधर्म मानलं जातं.

“काम किती वेळ अडवायचं” हाच त्यांचा अनुष्ठान धर्म!

आणि हे महाराज एकटेच नाहीत बरं का—त्यांच्या सोबत इतरही “पुराणसखेसोबती” आहेत.

👉 देवयानी –

भावनिक फुलझड्या आणि तक्रारींचे बंब सोडण्यात पटाईत.

तिचं सूत्र असतं – “मीच बरोबर, बाकी सगळे चुकले!”

ईमेल्स, नोटिंग्ज, फोनकॉल्सचा पाऊस पाडून ती वातावरण इतकं गढूळ करते की, खिडकीतली झाडंही कोमेजतात.

👉 कच –

वरिष्ठांचा खास पाळीव.

त्यांचं ऐकलं म्हणजे आयुष्य यशस्वी झालं, असं त्याला वाटतं.

कामाचं काय? ते होणारच नाही, पण “हो हो, लगेच करतो” असं म्हणून तो जग जिंकतो.

(प्रत्यक्ष मात्र एकही काटा हलत नाही.)

👉 शर्मिष्ठा –

समोरून हसते, मागून वार करते.

कुणाचं श्रेय हिसकावणं, मिटिंगमध्ये आपलं नाव ठळक करणं, आणि इतरांना पायरी बनवून वर चढणं—

हा तिचा रोजचा व्यायाम.

आता या पात्रांचं खरं कौशल्य कुठं दिसतं माहीत आहे का?

मिटिंगमध्ये!

मिटिंग म्हणजे “काम करण्यासाठी बैठक” नव्हे,

ती म्हणजे “काम पुढे ढकलण्यासाठी परिषद!”

दोन तास चर्चा होते—

पहिला तास अजेंड्यात काय आहे हे शोधण्यात,

आणि दुसरा तास चहा–बिस्कीट संपवण्यात.

निष्कर्ष?

शून्य!

फाईल जिथे होती तिथेच, आणि वेळ मात्र गेला दोन तास.

या सगळ्या कौरव मायेपुढे काम करणारे पांडव दिवसभर झुंज देतात,

पण त्यांचा पराभव ठरलेलाच असतो.

शेवटी काय होतं?

फाईल पुढं सरकत नाही,

काम वेळेत पूर्ण होत नाही,

जनतेचं नुकसान होतं…

पण यांना काय फरक पडतो?

त्यांच्या नजरेत काम अडवणं हेच धर्म,

आणि काम करणं हा अधर्म!

वा रे कार्यालयीन कार्यपद्धती…!

पुराणातली पात्रं आज जिवंत झाली आहेत,

फक्त फरक एवढाच—

महाकाव्याऐवजी ती आता आपल्या फाईलमध्ये आणि मिटिंगमध्ये बसली आहेत!

डिस्क्लेमर :

वरील ललित लेख हा पूर्णपणे काल्पनिक व व्यंग्यात्मक स्वरूपाचा आहे. त्यातील पात्रं, घटना, संदर्भ हे सर्व कल्पनाविलसित असून वास्तवाशी त्यांचा काहीही संबंध नाही. जर या वर्णनाचं एखाद्या व्यक्ती, कार्यालय किंवा संस्थेशी साम्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अविनाश निंबाळकर : साधेपणातून घडलेला अर्थपूर्ण जीवनप्रवास

दामिनी : आतल्या आकाशात चमकलेली वीज

🎖️ गौरव पत्र 🎖️ईएचव्ही यंत्रणांच्या वतीने मा. संचालक (प्रकल्प) श्री. अविनाश निंबाळकर साहेब यांना