विसर्जन

 


विसर्जन

✍️ सुनिलदत्त कुलकर्णी, जेजुरी

दरवर्षी आपण प्रेमानं गणपतीची मूर्ती घरी आणतो,

घराचा प्रत्येक कोपरा त्या मूर्तीच्या प्रकाशाने उजळतो.

आरतीतून, नैवेद्यातून, हसण्यातून, अश्रूंमधून—

आपण त्या मूर्तीत सामावतो,  एकरूप होतो.

आणि मग एक दिवस येतो—

ज्याला आपण ‘विसर्जन’ म्हणतो.

पण विसर्जन म्हणजे शेवट नव्हे,

तो तर परतीचा प्रवास आहे—

मूळाशी, अनंताशी, आपल्या स्त्रोताशी.

जसा समुद्रातील एक थेंब

क्षणभर स्वतंत्र भासत असतो,

पण पुन्हा समुद्रात विलीन झाल्यावर

तो त्याचं अस्तित्व गमावत नाही—

तर समुद्राचा एक होतो.

तसंच जीवनही आहे—

काहीही कायमचं आपल्याकडे राहत नाही.

आपण जे वाटतो, तेच खरं ठरतं,

बाकी सगळं परत जातं—

निःशब्द, शांत, अनंतात.

जगणं म्हणजे एक उत्सव—

गजर, टाळ्या, दिवे, गर्दीचा झगमगाट.

पण शेवटच्या दिवशी

घर पुन्हा रिकामं होतं,

आणि त्या शांततेतून जाणवतं—

की सगळं असूनही आपण शेवटी रिकामेच उरतो.

जसा एक कलाकार रंगमंचावर उभा राहतो,

प्रेक्षक टाळ्या देतात, दाद देतात.

पण पडदा पडतो, दिवे विझतात,

गर्दी निघून जाते…

कलाकार एकटाच उरतो—

आणि तेव्हाच त्याला कळतं

की जीवन म्हणजे पडद्याआडचं एक गूढ रिकामेपण.

मग प्रश्न उरतो— आपण का साजरा करतो?

उत्तर सोपं आहे—

कारण जगणं म्हणजे केवळ अस्तित्व नाही,

ते म्हणजे सामावणं,

देणं, आणि अखेरीस परतणं.

विसर्जन म्हणजे त्या देण्याचं गूढ स्मरण.

आपण जर प्रेमानं नाती जपली,

काळजीनं माणसं उभी केली,

तर आपलं विसर्जन म्हणजे केवळ देहाचं संपणं नाही—

ते स्मृतींचं समुद्रात विलीन होणं ठरतं.

आणि त्या क्षणी,

मूर्तीप्रमाणे आपणही हळुवार कुजबुजतो—

“मी आलो,

थोडं उजळलो,

आता परत जातो—

अनंतात, अखंडात, मूळात.”

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अविनाश निंबाळकर : साधेपणातून घडलेला अर्थपूर्ण जीवनप्रवास

दामिनी : आतल्या आकाशात चमकलेली वीज

🎖️ गौरव पत्र 🎖️ईएचव्ही यंत्रणांच्या वतीने मा. संचालक (प्रकल्प) श्री. अविनाश निंबाळकर साहेब यांना