मनाच्या शरणागतीची गाथा
मनाच्या शरणागतीची गाथा
✍️ सुनिलदत्त कुलकर्णी, जेजुरी
कधी कधी आयुष्य आपल्याला एका अशा वळणावर आणून ठेवतं,
जिथे पुढं जाण्याचा रस्ता दिसतो, पण चालण्यासाठी पायच साथ देत नाहीत.
मनात आशेचा घोडा असतो, पण त्याचा लगाम नियतीच्या हातात.
आपण धडपडतो — प्रत्येक रिकाम्या जागेकडे पाहतो,
“कदाचित ही आपलीच असेल” असं स्वतःलाच पटवतो.
पण नियती हसते — आणि शांतपणे सांगते,
“ही रिक्तता तुझ्यासाठी नव्हतीच.”
मग एक क्षण येतो — आशेचा आवाज मंदावतो,
मन थकून, हळूहळू शरणागत होतं.
त्या क्षणी जाणवतं, की जगणं म्हणजे केवळ धडपड नाही,
तर न होण्याच्या वेदनेला स्वीकारण्याचंही एक सौंदर्य असतं.
आपण वारंवार विचारतो — “का नाही झालं?”
पण उत्तरं नेहमीच शब्दांत नसतात.
कधी ती एखाद्या बंद दरवाज्याच्या शांततेत असतात,
कधी अपूर्ण स्वप्नांच्या राखेत.
मनाला आवर घालणं म्हणजे स्वतःलाच हरवणं नव्हे,
तर स्वतःलाच परत सापडणं असतं.
जोपर्यंत मन नियतीशी वाद घालतं,
तोपर्यंत त्याचं ओझं वाढतं.
पण ज्या दिवशी मन नियतीच्या कुशीत शिरतं,
त्या दिवशी त्याला पहिल्यांदा विश्रांती लाभते.
एक उदाहरण आठवतं —
एका बागेत दोन झाडं होती.
पहिलं झाड रोज आकाशाकडे पाहून विचारायचं,
“मी एवढं वाढतोय, तरी फुलं का नाही फुटत?”
दुसरं झाड शांत असायचं —
कारण त्याला माहित होतं, त्याचं काम सावली देणं आहे, सुगंध पसरवणं नव्हे.
काही जागा आपल्यासाठी नसतात,
काही लोक आपल्याकडे पाहतही नाहीत —
पण याचा अर्थ आपण कमी आहोत असं नाही.
याचा अर्थ फक्त एवढाच —
आपण दुसऱ्या पातळीवर जगायचं ठरवलंय,
जिथे मान्यता नव्हे, तर मनःशांती महत्त्वाची असते.
म्हणूनच —
मनाला सांगावं, “पळू नकोस आता.”
नियतीच्या मांडीवर डोकं ठेऊन शांत झोप घे.
कारण जिथे माणसं वेगळी असतात,
तिथे ईश्वरही तसाच अदृश्यपणे आपल्यासाठी वेगळी योजना विणत असतो.
रिक्त जागा
जागा रिक्त झाली तरी ती
आम्हाला मिळणार नाही
वरवर पाहणाऱ्यांची नजर
आमच्यावर खिळणार नाही
आशेवर स्वार होऊन
मना आता पळू नकोस
नियतीला शरण जा
मना आता छळू नकोस
काहीच होणार नाही
आता तुझ्या मनासारखे
ते सोडून तो विचार
माणसे कुठे असतात एकसारखे
दि. 17.10.2025

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा