सूत्रधाराच्या सावलीत आयुष्य


 सूत्रधाराच्या सावलीत आयुष्य 

✍️ सुनिलदत्त कुलकर्णी, जेजुरी

काही रंगमंचांवर आपण उभे असतो,

पण प्रकाश आपल्यावर येतच नाही.

आपण दिसतो —

पण आपण केंद्रस्थानी नसतो.

कथानक आधीच लिहिलेलं असतं,

दृश्य आखलेलं असतं,

आणि भूमिका —

आपल्याला फक्त निभावायची असते.

आपण बोलतो,

लोक टाळ्या वाजवतात किंवा शांत राहतात.

आपण जगतो,

जग मान डोलवतं किंवा शंकेच्या सावल्या आपल्यावर टाकतं.

पण दिग्दर्शन?

ते मात्र आपल्या हातात नसतं.

कोणीतरी

मागच्या अंधारात उभा राहून

सूत्रं हलवत असतो.

आपल्या ओळखीची सीमा,

आपल्याला मिळणाऱ्या संधींची दारे,

आपल्या अपयशांच्या खोल्या —

तेच ठरवत असते.

आणि आपण?

आपण प्राण ओततो.

अपेक्षा करतो.

आतून झिजतो.

मन जळू देतो.

कधी कधी

काही सुंदर घडतं —

तेव्हा जग म्हणतं,

“व्वा! नशीब!”

“मेहनतीचं फळ!”

“तुझ्यात दम आहे!”

पण जेव्हा

काहीच घडत नाही —

तेव्हा मात्र

निशब्दता आपल्याला बिलगते.

एकदा

एक माणूस मुलाखत संपवून

लांब कॉरिडॉरमध्ये एकटा उभा होता.

ज्ञान दिलं होतं.

परिश्रम दिले होते.

आणि हो — मनही दिलं होतं.

परिणाम लागला.

त्याचं नाव नव्हतं.

कोणी एक सहज म्हणालं —

“पुढच्या वेळी प्रयत्न करा.”

तो हसला.

पण ते हसू नव्हतं.

ते होती

अंतरंगात उगवलेली एक पक्की जाणीव —

“कथा माझी नव्हतीच.

मी फक्त पात्र होतो.

सूत्रं दुसऱ्याच हातात होती.”

याच क्षणी

आयुष्याचा सत्यदीप उजळतो —

आपण कमी नसतो.

आपले परिश्रम खरे असतात.

आपली झुंज जिवंत असते.

पण

अंतिम दृश्य?

ते सूत्रधारच लिहितो.

म्हणून प्रश्न कधीच असा नसतो —

“मी जिंकलो का हरलो?”

प्रश्न एकच —

मी माझी भूमिका

सत्यतेने, मनापासून, निर्व्याजपणे निभावली का?

जर उत्तर ‘हो’ असेल —

तर पडदा पडताना

आपल्या चेहऱ्यावर पडणारा प्रकाश

स्वतःच पवित्र ठरतो.

बाकी सगळं —

टाळ्या, शांतता, सन्मान, दुर्लक्ष, गौरव, गोंधळ —

हे त्याच्या इच्छेवर.

आपल्याला फक्त

आपली भूमिका

समर्पणाने जगायची.

कारण

सूत्रधाराची सावली

कधीही रिकामी नसते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अविनाश निंबाळकर : साधेपणातून घडलेला अर्थपूर्ण जीवनप्रवास

दामिनी : आतल्या आकाशात चमकलेली वीज

🎖️ गौरव पत्र 🎖️ईएचव्ही यंत्रणांच्या वतीने मा. संचालक (प्रकल्प) श्री. अविनाश निंबाळकर साहेब यांना