मन नावाचं घर
मन नावाचं घर
✍️ सुनिलदत्त कुलकर्णी, जेजुरी
“घर आहे, पण प्रकाश फक्त आतल्या हृदयातून.”
घर उभं करण्याच्या गडबडीत लोकांना विटांची संख्या, सिमेंटचा दर्जा, रंगांच्या छटा, पडद्यांचे फोल्ड, फॉल्स सिलिंगचे काटेकोर डिझाईन — सगळं आठवतं.
पण त्या घरात उब कोण आणणार?
स्पर्श कोण देणार?
थकलेल्या मनाचा भार कोमलतेने कोण उचलणार — याचा विचार मात्र सहसा होत नाही.
घर म्हणजे चार भिंती नव्हेत;
घर म्हणजे चार हृदयस्पर्शी श्वासांची सोबत.
मन नावाचं घरही असंच.
बांधताना आपण ताकद विसरतो, पण जगताना मात्र हृदयाची सच्ची उब लागते.
लग्न म्हणजे दोन देहांची संगती नाही —
ते दोन जगांच्या सावल्या, अनुभव, स्वप्नं, जखमा आणि आशा या सगळ्यांचा शांत संगम आहे.
पण या संगमाची पहिली पायरी आहे — का?
का आपण कोणाचे नाव आपल्या श्वासात विणू?
का आपण कोणासाठी स्वतःचा वेळ, आपली जागा, आपले शांत कोपरे मोकळे करू?
का आपण कुणाच्या चुकांवर हसू टिकवू, कुणाच्या आक्रोशावर हात फिरवू?
का आपण कुणाच्या स्वप्नांना आपल्या छातीत श्वास देऊ?
हा ‘का’ जर उलगडला नाही,
तर आयुष्य सजावट असतं — संबंध नाही.
नाते मग एका महागड्या अल्बमसारखे होते —
फ्रेममध्ये परफेक्ट.
मनात मात्र रिकामं.
एकदा एका परिचय समारंभात असंच झालं.
हॉल चकाकत होता, नजरा चमकत होत्या.
पण प्रश्न मात्र सगळे how चे —
“नोकरी कुठे?”
“पगार किती?”
“घरी कोणकोण?”
“सुट्टी किती?”
“फ्लॅट आहे का?”
क्षणभर कुणालाच जाणवलं नाही की या प्रश्नांत मन कुठेच नव्हतं.
तेव्हाच मुलगी हलकेच विचारते —
“तुम्हाला राग आला तर तुम्ही काय करता?”
हॉलमध्ये थोडा थांबलेला श्वास.
मुलगा हसून म्हणतो —
“मी शांत राहतो.”
पण ती हसू उत्तर नव्हतं.
ते तयार केलेलं चेहऱ्यावरचं पडदेपण होतं.
त्या मनाच्या भिंतींमध्ये आधीच भेगा होत्या — तिने पाहिल्या.
आणि ती उठली.
कोणावर आरोप नाही.
कोणाला दोष नाही.
फक्त स्वतःच्या मनाचं घर ढासळू नये म्हणून —
ती वेळीच परतली.
लग्न म्हणजे वाचवण्याची आणि जपण्याची प्रक्रिया आहे.
ते एकमेकांना सुधारायची धडपड नाही.
ते एकमेकांसोबत शांतपणे असण्याची परवानगी आहे.
का समजलं तर —
हात अडकत नाहीत — जुळतात.
श्वास गुदमरवत नाही — हलके होतात.
शब्द बोचत नाहीत — समजले जातात.
का समजला नाही तर —
आयुष्य होते
बाहेर सुगंध, आत राख असलेली अगरबत्ती.
लग्न करण्यापूर्वी घर सजवू नका —
तिथे राहणारं मन जाणून घ्या.
मन जुळलं…
तर उरलेलं विश्व दोघे मिळून नव्याने उभं करू.
नाही तर,
भिंती कितीही सुंदर रंगवल्या तरी
घर रिकामंच राहतं.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा