हलकं होण्याची कला
हलकं होण्याची कला
✍️ सुनिलदत्त कुलकर्णी, जेजुरी
“कधी कधी स्वतःला शोधायचं असेल, तर प्रथम हरवलेल्याला सोडा…”
खूप विचित्र आहे ना आपलं जगणं?
आपण जितकं जमवतो, तितकंच आपल्यावरचं ओझं वाढत जातं.
जमा करण्यामध्ये एक सुख असतं — “हे कधी कामी येईल” म्हणत आपण साठवतो.
पण कधी येते का ती वेळ?
बहुतेक नाहीच.
पण आपण सोडून देत नाही.
नातेसंबंध असो… आठवणी असोत… किंवा अगदी जुन्या कागदांच्या ढिगाऱ्यांपर्यंत.
घरातल्या कपाटाच्या तळाशी कुठेतरी एक पिशवी असते.
त्या पिशवीत “कधीतरी…” नावाचे स्वप्न असतात.
कधी न वाचलेले पत्र, कधी तुटलेली पेन, कधी न लागणारे किल्ल्या,
आणि कधी… कधी एक नात्याचे गाठोडे.
आपण ती पिशवी हलवतो.
पाहतो.
ओळखतो.
मनातल्या मनात विचार करतो —
“ठेवू दे, आठवणी आहेत…”
ठेवायचं?
कशाला?
आठवणी जर मनाला कुरतडत असतील, तर त्या आठवणी राहिल्या कुठे?
त्या तर जखमा झाल्या.
कापडात झुपके, भेगा पडलेल्या कपात, तुटलेल्या बांगड्या,
आणि न वापरता ठेवलेली रागांची पळसचाल…
या सगळ्यांची किंमत कधीचीच संपलेली असते.
पण आपण जपतो — “भावना” म्हणून.
भावना जर ओझ्यात बदलल्या,
तर त्यांना टाकणंच महाग!
उदाहरण सांगतो —
राहुलचा एक मित्र होता — अतिशय जवळचा.
कधीतरी गैरसमज झाला.
दोघांनी ईगोचं लोणचं घातलं.
फोन येणं थांबलं.
भेटण्यावर पायात काटा.
पण राहुल दर महिन्याला त्याच्या वाढदिवशी एक संदेश टाईप करे…
आणि न पाठवता डिलीट करे.
का?
कारण जुने दिवस आठवत.
पण,
आठवण जपण्याच्या नावाखाली तो वेदना जपत होता.
एवढं ओझं काय कामाचं?
एक दिवस त्याने फोन उचलला आणि ती शेवटची अडखळती दोरीही सोडून दिली.
ना राग. ना माफी. ना स्पष्टीकरण.
फक्त शांत सोडून देणं.
आणि त्या दिवसापासून त्याचे खांदे हलके झाले.
जीवनातला श्वास मोकळा झाला.
कधी कधी आपल्याला घर आवरण्याची गरज नसतेच.
आपल्याला मन आवरायचं असतं.
आणि मन आवरताना सर्वात आधी करायचं काम —
जे निरुपयोगी झालंय… ते बाहेर काढणं.
नातं असो, आठवण असो, वस्तू असो, अपेक्षा असो,
किंवा स्वतःबद्दलची खोटी प्रतिमा.
आयुष्याला जागा पाहिजे असते —
नव्या माणसांसाठी, नव्या क्षणांसाठी, नव्या श्वासांसाठी.
आणि जागा नाही मिळत कारण आपण जुन्याला चिकटून बसलोय.
मोठा प्रश्न —
जपायचं की सोडायचं?
उत्तर खूप साधं —
जे तुमचं नसूनही तुम्हाला पकडून बसलंय… ते सोडा.
सोडणं म्हणजे पराभव नाही.
सोडणं म्हणजे स्वतःला मोकळं करणं.
कारण कधी कधी,
सर्वात मोठं जिंकणं म्हणजे — हलकं होणं. 🌿

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा