चालू द्या… थोडं हळूच!
चालू द्या… थोडं हळूच!
✍️ सुनिलदत्त कुलकर्णी, जेजुरी
"जीवन महामार्ग असला तरी त्यावर एक्सप्रेस लेन नसते."
कधी कधी वाटतं — जग एखाद्या न दिसणाऱ्या रणांगणात पळतंय.
हाक कुणाचीच नाही, पण धाव सगळ्यांची — जीव तोडून.
लवकर श्रीमंती,
लवकर प्रसिद्धी,
लवकर “सेटल” हा शिक्का,
लवकर सुखाचे फोटो —
जणू आनंदाला सुद्धा आता डिलिव्हरी टाइम ठरला आहे.
पण जीवन, मित्रा…
जीवन महामार्ग असला तरी त्यावर एक्सप्रेस लेन नसते.
इथे प्रत्येक पाऊल जमिनीला स्पर्श करताना थोडासा घासून घेतं —
तेव्हाच उभं राहण्याचा अर्थ सिद्ध होतो.
आपण मात्र?
चालण्याची लय शिकली नसताना धावण्याची इच्छा —
राजबिंड स्वप्नं कच्च्या पायांवर.
थांब जरा…
चंद्र पौर्णिमा होतो तेव्हा तो आधी अंधार पितो.
झाडाला फळ येतं तेव्हा ते चार ऋतूंचं मौन सोसतं.
गालिचा विणला जातो तेव्हा धागा असंख्य वेळा ताण सहन करतो.
इतकं सगळं सहन होतं…
फक्त आपणच — “आत्ताच हवं!” या हुकूमशाहीत जगतो.
राजू आठवतो?
कालच ठरवलं — “यूट्यूब करायचं. पाच दिवसांत स्टार!”
कॅमेरा ऑन.
“नमस्कार मित्रांनो…”
आवाज फुटतो. शब्द अडकतात. नजर तिरपी.
दहा रेकॉर्ड. वीस एडिट.
शेवटी व्यू — शून्य.
तेव्हा कळतं —
जे सोपं दिसतं, ते कुणीतरी वर्षानुवर्षं आतून तुटत-घासत घडवलं असतं.
झळकणं अचानक असतं,
पण जळणं?
ते मात्र शांत… गुपचूप… सातत्याचं.
खरं तर जीवनाची गती हा वेगाचा उन्माद नसतो;
ती संयमाची, जाणीवेची, आणि श्वासाच्या उष्णतेची मुलगी असते.
तिला वाढू देण्यासाठी वेळ द्यावा लागतो.
जग जिंकणं म्हणजे धावणं नसतं,
ते म्हणजे स्वतःच्या चालीनं, स्वतः न हरवता जगणं.
कधी कुणी पुढे गेलं, चमकलं, उंचावलं —
तेव्हा मनाला अगदी हळूच सांगावं:
“आपण आपली गती चाललो आहोत. आपल्या धडधडीतून, आपल्या मातीच्या पावलांनी.”
सुख येतं ते झटक्यात नाही.
ते थेंब-थेंब साचतं.
जिथे मन शांत, पक्कं, आणि जागं असतं.
आणि मग कुठल्यातरी साध्या दिवसावर…
अकस्मात जाणवतं —
जगणं म्हणजे धावणं नाही.
जगणं म्हणजे स्वतःला न हरवता चालणं.
बस्स इतकंच.
थोडं हळूच.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा