पुढची चाल…
पुढची चाल…
✍️ सुनिलदत्त कुलकर्णी, जेजुरी
“पुढची चाल, मित्रा… तुझ्याच हातात आहे.”
जीवन म्हणजे एक अखंड पट.
त्यावर माणूस आपली प्रत्येक कृती, प्रत्येक शब्द, प्रत्येक भावना
— जणू काळ्या फळ्यावर उमटणाऱ्या खुणांसारख्या — कोरत जातो.
काही रेषा सरळ — शिस्त, संयम आणि जाणिवेच्या हातातल्या.
काही रेषा वक्र — मनाच्या धडधडीत हात कंपला म्हणून.
काही धुसर — अश्रूंच्या धूसर ओलाव्यात विरघळलेल्या.
आणि काही गडद — अहंकाराच्या शाईत बुडालेल्या.
आपण अनेकदा प्रयत्न करतो —
ही चूक पुसावी,
तो शब्द परत घ्यावा,
तो प्रसंग विसरावा,
ती आठवण मिटवावी…
पण आत्म्याचा फळा पुसून स्वच्छ होत नाही.
तो समजून स्वच्छ होतो.
स्वीकारातून शांत होतो.
एक छोटा प्रसंग —
एक मूल बुद्धिबळ शिकत होतं.
पहिल्याच खेळात त्याचा घोडा गेला.
विरोधकाचा मोहरा शांतपणे पुढे आला.
मुलाचे डोळे भरले.
पट बाजूला झाला.
“आता खेळण्यात अर्थ नाही…”
त्याचा आवाज थरथरला.
बाबा काही क्षण शांत होते.
मग म्हणाले —
“खेळ एका मोहऱ्याने कधीच संपत नाही रे.
हरलेला मोहरा नाही…
हरलेला धीर असतो.”
मुलाने पुन्हा पट पाहिला.
मोहेरे शांत होते — पण जिवंत.
त्याने श्वास सावरला. एक नवीन चाल आखली.
तो शेवटी जिंकला की हरला —
याला काहीच अर्थ नव्हता.
महत्त्वाचं एवढचं —
त्याने खेळ सोडला नव्हता.
जीवनही तसंच असतं.
आपण चुकतो.
ज्यांच्यावर सर्वाधिक प्रेम असतं, त्यांनाच कधी कठोर शब्द लागतात.
कधी नाती दुखावतात, कधी मन तुटतं…
आणि तेव्हा वाटतं —
“आता सगळं संपलं.”
पण जीवनाचं नावच पुन्हा उभं राहणं आहे.
काल एखादं नातं तुटलं असेल,
आज ते मनापासून शिवता येतं.
काल शब्द कठोर होते,
आज त्यात मृदुता येऊ शकते.
काल मन थकलं होतं,
आज पुन्हा एक मऊसा श्वास घेता येतो.
कारण चूक ही दोष नसते —
ती पुढच्या चालीचा दीप असते.
पट अजूनही पूर्ण भरलेला नाही.
काही मोहरे गेले — काही अजून ताठ उभे आहेत.
आणि आपण?
आपण अजून जिवंत आहोत.
आशा अजूनही उजळ आहे.
संधी अजूनही दारात शांत थांबल्या आहेत.
देव शांत आहे —
पण उपस्थित आहे.
आणि तो हलकेच सांगतो —
“पुढची चाल, मित्रा…
हळुवार घे.
पण घे.
कारण तू अजून हरलेला नाहीस.” ✨🌙

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा