मी… आणि हरवलेल्या पावलांचा मागोवा

 मी… आणि हरवलेल्या पावलांचा मागोवा 

✍️ सुनिलदत्त कुलकर्णी, जेजुरी

कधी कधी ना, आयुष्याच्या अफाट गर्दीत

एकदम हलक्या किरणासारखं काहीतरी चमकतं.

ते चमकणं आवाज करत नाही,

ते नजरेला ठोसा देत नाही,

ते फक्त मनाच्या कोपर्‍यात एक कुजबुज सोडतं—

“अरे… मी कुठे?”

आपण जगताना किती मुखवटे चढवतो…

घरी आपण कोणाचा मुलगा, कोणाचा पती, कोणाचा बाप.

ऑफिसमध्ये— कोणाचा अधिकारी, कोणाचा ‘डेडलाईन वाचवणारा’

आणि समाजात तर आपण कायम

‘उभा, ठाम, समर्थ’ दिसायला हवं अशा चौकटीत.

या सगळ्यांच्या आड,

एक छोटासा, नगण्य वाटणारा, पण अत्यंत जिवंत मी असतो.

तो फार मागत नाही.

त्याला पदं, सत्ता, कौतुक, गौरव नको.

त्याला फक्त हवाय—

थोडा स्वच्छ श्वास,

थोडी मनमोकळी हसण्याची जागा,

आणि स्वतःसोबत बसण्याइतकं अडथळाविरहित अस्तित्व.

पण आपण?

पहाटेचा चहा घ्यायच्या आधीपासून

रात्री थकल्यावर उशीवर डोकं टेकेपर्यंत

‘करणं, निभावणं, मिळवणं, टिकवणं’

यांच्या रणधुमाळीत हरवत राहतो.

एके दिवशी, कोणत्यातरी शांत दुपारी,

जुनी डायरी, एखादा फोटो, एखादं गाणं

किंवा अचानक लागलेला वाऱ्याचा स्पर्श

तो हरवलेला मी परत येतो…

डोळ्यात अस्पष्टशी पाण्याची किनार बनते.

ओठांवर नकळत एक हलकीशी स्मितरेषा दिसते.

आणि मन हलकं होतं.

पण आपण त्यावेळी काय करतो?

त्याच्याकडे बघतो…

मनात म्हणतो,

“किती छान होता मी!”

आणि पुन्हा त्याला ठेवून देतो.

खोल कप्प्यात.

‘वेळ मिळाला की बघू’ या सबबीच्या छायेत.

उदाहरण द्यायचं?

कॉलेजच्या जुन्या फोटोमधला तू आठव…

वाऱ्यात उडणारे केस,

पाठीवर बॅग,

चेहऱ्यावर धाडसी हसू—

काहीच सिद्ध करायचं नव्हतं त्या वेळी,

फक्त जगायचं होतं.

आज?

आपण बंगल्यात पोहोचलो,

नावात पोहोचलो,

पदात पोहोचलो,

पण स्वतःकडे पोहोचायचं विसरलो.

आणि हे बघ—

आयुष्य फार मोठं काही मागत नाही.

ते थांबायला सांगत नाही.

ते धावू नको असंही सांगत नाही.

ते फक्त म्हणतं—

धाव, पण धावताना स्वतःला मागे टाकू नकोस.

तर मग काय करायचं?

जास्त काही नाही.

फक्त दहा मिनिटं.

हो, दहा.

न मोठ्या प्रवचनांची गरज नाही.

ना मोठ्या बदलांची.

बस. शांत.

मोबाईल दूर.

डोळे अलगद मिट.

एका खोल श्वासात स्वतःला परत परत ओळख.

आणि हळूच म्हण—

“मी… इथेच आहे.”

तेवढं झालं की,

आयुष्य परत हात धरून चालायला लागतं.

गर्दी कमी होत नाही,

पण आपण हरवत नाही.

आणि एवढंच पुरेसं असतं. 


टिप्पण्या

  1. शेवटच्या ओळी अगदी मुद्द्याच आणि नेमकं बरोब्बर सांगीतल्या..... मस्त लिहिलं सर

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अविनाश निंबाळकर : साधेपणातून घडलेला अर्थपूर्ण जीवनप्रवास

दामिनी : आतल्या आकाशात चमकलेली वीज

🎖️ गौरव पत्र 🎖️ईएचव्ही यंत्रणांच्या वतीने मा. संचालक (प्रकल्प) श्री. अविनाश निंबाळकर साहेब यांना