इग्नाइट : अंतर्मनातील ज्योतींचा महोत्सव

 इग्नाइट : अंतर्मनातील ज्योतींचा महोत्सव

 ✍️ सुनिलदत्त कुलकर्णी 

प्रादेशिक प्रशिक्षण केंद्र, वाळूज येथे साकारलेला “इग्नाइट – उजळुया ज्योती” हा उपक्रम केवळ प्रशिक्षणाचा कार्यक्रम नव्हता; तो अंतर्मनातील सुप्त प्रकाशाला जागवण्याचा एक साक्षात सोहळा होता.

दिवा पेटवणे सोपे असते—वात, तेल आणि एक ठिणगी पुरेशी ठरते. पण माणसाच्या अंतर्यामध्ये चेतना प्रज्वलित करायची असेल, तर लागते जाणीवेची मशाल, आत्मपरीक्षणाची शिदोरी आणि सातत्याची निष्ठा.

‘इग्नाइट’ म्हणजे केवळ ठिणगी नव्हे; ती दिशा देणारी प्रेरणा आहे. ती विचारांना आकार देते, वर्तनाला धार देते आणि मूल्यांना अधोरेखित करते. प्रत्येक प्रशिक्षण सत्र हे माहितीचे संकलन असते; पण ‘इग्नाइट’ हा आत्मजागृतीचा प्रारंभबिंदू ठरला.

स्पष्टतेतून प्रज्वलन

परिवर्तनाची सुरुवात नेहमी स्पष्टतेतून होते.

आपण कुठे उभे आहोत? आपली भूमिका काय आहे? आणि आपल्याला कोणत्या शिखराकडे वाटचाल करायची आहे?

या प्रश्नांची प्रामाणिक उत्तरेच अंतर्मनातील पहिली ज्योत पेटवतात.

प्रशिक्षक आणि सहभागी यांची ओळख ही केवळ नावांची देवाणघेवाण नसते; ती अनुभवांची सांगड असते. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील संघर्ष, यश-अपयश आणि शिकवणी यांच्या कथा जेव्हा उलगडतात, तेव्हा सभागृहातील भिंती नव्हे तर विचारांचे क्षितिज विस्तारते.

संवादातून विश्वास, विश्वासातून परिवर्तन

अपेक्षा व्यक्त झाल्या की संवाद जन्म घेतो.

संवादातून विश्वास निर्माण होतो.

आणि विश्वासाच्या सुपीक भूमीत परिवर्तनाची बीजे रुजतात.

आपल्या आयुष्याला गती देणारे विचार कोणते?

आशेची निवड की शंकेची?

माणूस प्रत्येक क्षणी स्वतःशी संवाद साधत असतो. हा ‘सेल्फ-टॉक’च त्याच्या यशाचा किंवा अपयशाचा आराखडा ठरतो. बाह्य परिस्थिती कधीच पूर्णपणे आपल्या हातात नसते; पण अंतर्मनातील निवड मात्र आपल्या हाती असते.

शिस्त, प्रेरणा आणि नियोजन : व्यक्तिमत्त्वाची दीपमाळ

शिस्त म्हणजे बंधन नव्हे; ती स्वातंत्र्य टिकवण्याची गुरुकिल्ली आहे.

नियोजन म्हणजे वेळेवर नियंत्रण नव्हे; ते उद्दिष्टांवर प्रभुत्व मिळवण्याचा आराखडा आहे.

प्रेरणा बाहेरून दिली जाऊ शकते; पण ती टिकते तेव्हा जेव्हा ती अंतर्मनात ज्वालेसारखी पेटते.

संवादकौशल्य आणि नातेसंबंध व्यवस्थापन ही केवळ व्यवस्थापनाची साधने नाहीत; ती माणुसकीची अभिव्यक्ती आहेत.

भावनिक बुद्धिमत्ता शिकवते—बुद्धी यश देते, पण भावना नाती जपतात.

जबाबदारीची मालकी आणि सक्रियतेची ओळख

परिस्थितीची वाट पाहणे हा पर्याय नसतो; परिस्थितीच्या आधी उभे राहणे हीच सक्रियतेची खरी ओळख आहे.

जबाबदारी स्वीकारणे म्हणजे दोष झटकणे नव्हे; तर परिणामाची मालकी घेणे होय.

व्यसन केवळ पदार्थांचे नसते—नकारात्मकतेचे, टाळाटाळीचे, न्यूनगंडाचेही असते.

त्या अदृश्य साखळ्या तोडणे म्हणजेच अंतर्मनाची खरी मुक्तता.

अर्थपूर्णतेचा शोध

‘इगिकाई’चा विचार करताना प्रश्न उभा राहतो—

आपल्याला काय आवडते?

आपल्याला काय जमतं?

समाजाला काय आवश्यक आहे?

आणि ज्यातून उपजीविका होते ते काय?

या चौकटीत स्वतःची ओळख सापडली की आयुष्य केवळ उपजीविकेपुरते राहत नाही; ते ध्येयवेड्या प्रवासात रूपांतरित होते.

टीमवर्क शिकवते—

एकटा माणूस वेगाने जाऊ शकतो;

पण टीम दूरवर पोहोचते.

‘पॉवर ऑफ पॉज’ आपल्याला सांगते—

थांबणं म्हणजे पराभव नव्हे; ती पुढच्या झेपेची तयारी असते.

तणाव हा शत्रू नाही; तो आपल्या क्षमतेचे प्रतिबिंब दाखवणारा आरसा आहे.

ज्योतींचा महोत्सव

“इग्नाइट” तीन दिवसांचा कार्यक्रम असला तरी त्यातून चेतवलेली ज्योत दीर्घकाळ प्रज्वलित राहावी, हीच खरी अपेक्षा.

ती आपल्या कृतीतून, नेतृत्वातून आणि संवादातून दिसली पाहिजे.

कारण—

ज्योत लहान असली तरी अंधाराला पुरेशी असते;

ती जपण्याची जबाबदारी मात्र आपली असते.

चला, उजळूया ज्योती—

स्वतःची, टीमची आणि संस्थेची.

कारण एक ज्योत पेटली की अनेक दिवे आपोआप प्रकाशमान होतात.

आणि प्रकाशाचा हा महोत्सवच खरी परिवर्तनयात्रा ठरते. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अविनाश निंबाळकर : साधेपणातून घडलेला अर्थपूर्ण जीवनप्रवास

दामिनी : आतल्या आकाशात चमकलेली वीज

🎖️ गौरव पत्र 🎖️ईएचव्ही यंत्रणांच्या वतीने मा. संचालक (प्रकल्प) श्री. अविनाश निंबाळकर साहेब यांना