माझा जीवन टूलबॉक्स : एका अभियंत्याची मनोगत पेटी
माझा जीवन टूलबॉक्स : एका अभियंत्याची मनोगत पेटी
✍️ सुनिलदत्त कुलकर्णी, वाळूज
वीज उपकेंद्रात काम करणाऱ्या प्रत्येक अभियंत्याजवळ एक छोटीशी लोखंडी पेटी असते — टूलबॉक्स.
पहिल्या नजरेला ती अगदी साधी दिसते.
पण त्या पेटीत फक्त स्पॅनर, प्लायर, स्क्रूड्रायव्हर किंवा टेस्टर नसतात…
त्या पेटीत असते तयारी, अनुभव, आणि संकटाला सामोरं जाण्याची शांत ताकद.
उपकेंद्रात अनेकदा अशी वेळ येते की एखादा छोटासा नट सैल झाला की मोठी यंत्रणाही डळमळते.
अलार्म वाजतो, नियंत्रण कक्षात हलकी धावपळ सुरू होते.
पण अनुभवी तंत्रज्ञ घाई करत नाही.
तो टूलबॉक्स उघडतो…
योग्य स्पॅनर घेतो…
आणि क्षणात सैल झालेली पकड पुन्हा घट्ट करून संपूर्ण व्यवस्था स्थिर करतो.
तो प्रसंग पाहताना माझ्या मनात नेहमी एक विचार येतो —
उपकेंद्रासाठी टूलबॉक्स असतो,
मग जीवनासाठीही काही टूलबॉक्स असतो का?
अर्थात असतो.
फरक एवढाच —
तो हातात नसतो…
तो मनात असतो.
माझ्या जीवन टूलबॉक्समधली साधनं
कधी कधी शांत बसलो की मी मनातला तो अदृश्य टूलबॉक्स उघडतो.
आणि त्यातली काही साधनं मला स्पष्ट दिसतात.
संयम — हा माझ्या टूलबॉक्समधला स्पॅनर.
जीवनात काही नट बोल्ट इतके घट्ट अडकतात की रागाने ते सैल होत नाहीत.
संयमाने मात्र ते हळूहळू मोकळे होतात.
समजूतदारपणा — हा स्क्रूड्रायव्हर.
नात्यांमध्ये अनेकदा छोटे छोटे स्क्रू सैल होतात.
समजुतीचा हलका हात फिरवला की नाती पुन्हा घट्ट बसतात.
विवेक — हा टेस्टर.
कोणती वायर जिवंत आहे आणि कोणती मृत, हे टेस्टर सांगतो.
जीवनात योग्य आणि अयोग्य यातील फरक विवेक दाखवतो.
सकारात्मकता — ही इन्सुलेटेड टेप.
कधी मन तुटतं, कधी आशा तुटते.
पण सकारात्मकतेची टेप लावली की तुटलेले तार पुन्हा जोडली जाते .
विनोदबुद्धी — हे माझ्या टूलबॉक्समधलं सर्वात हलकं पण सर्वात प्रभावी साधन.
जीवनाच्या मशीनमध्ये घर्षण वाढलं की थोडा विनोद केला की वातावरण लगेच गुळगुळीत होतं.
उपकेंद्रातील एक खुमासदार किस्सा
एकदा प्रशिक्षणादरम्यान मी काही नवख्या तंत्रज्ञांना विचारलं —
“तुमच्या टूलबॉक्समध्ये सर्वात महत्त्वाचं साधन कोणतं?”
एक जण म्हणाला —
“सर, टेस्टर.”
दुसरा म्हणाला —
“स्पॅनर.”
तिसरा म्हणाला —
“प्लायर.”
पण मागून एक अनुभवी लाइनमन शांतपणे म्हणाला —
“साहेब… सर्वात महत्त्वाचं साधन म्हणजे अक्कल.”
सगळे हसू लागले.
तो पुढे म्हणाला —
“अक्कल असेल तर कोणतं टूल वापरायचं ते समजतं.
नसेल तर टूलबॉक्स भरलेला असला तरी स्क्रू मोडतो!”
त्या दिवशी मला एक छोटा पण मोठा धडा मिळाला.
जीवनातला अपूर्ण टूलबॉक्स
जीवनात आपण अनेकदा अडचणीत अडकतो.
समस्या फार मोठी असते म्हणून नाही…
तर आपल्या टूलबॉक्समध्ये योग्य साधन नसतं म्हणून.
काही लोकांकडे पैसा असतो — पण संयम नसतो.
काही लोकांकडे ज्ञान असतं — पण विनम्रता नसते.
काही लोकांकडे पद असतं — पण समज नसते.
म्हणजेच त्यांचा जीवन टूलबॉक्स अपूर्ण असतो.
रोजचा टूलबॉक्स तपास
उपकेंद्रात काम करणारा तंत्रज्ञ रोज सकाळी टूलबॉक्स तपासतो.
काही साधन हरवलं आहे का?
काही तुटलं आहे का?
कदाचित आपणही दररोज स्वतःला एक प्रश्न विचारायला हवा —
आज माझ्या जीवन टूलबॉक्समध्ये आहे का —
संयम?
समजूतदारपणा?
सकारात्मकता?
विनोद?
आणि थोडंसं प्रेम?
कारण आयुष्य ही एक मोठी यंत्रणा आहे…
आणि त्या यंत्रणेचा मुख्य अभियंता आपणच आहोत.
उपकेंद्रातील टूलबॉक्स आपल्याला एक साधं पण गहन तत्त्वज्ञान शिकवतो —
साधनं जवळ असली की समस्या मोठी वाटत नाही.
जीवनातही तसंच असतं.
ज्याच्या मनात मूल्यांचा टूलबॉक्स समृद्ध असतो
त्याच्यासाठी संकटं म्हणजे फक्त सैल झालेले नट बोल्ट असतात.
थोडा संयम…
थोडा विचार…
थोडी समज…
आणि जीवन पुन्हा सुरळीत चालू लागतं.
हातात टूलबॉक्स असेल
तर यंत्र दुरुस्त होतं,
मनात मूल्यं असली
तर आयुष्य सुरळीत होतं.
अभियंता फक्त मशीन दुरुस्त करत नाही…
तो कधी कधी
स्वतःचं आयुष्यही
हळूहळू जोडत असतो.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा