दिव्याची शिक्षा
दिव्याची शिक्षा
✍️ सुनिलदत्त कुलकर्णी, वाळूज
काही माणसे आयुष्यात दिवे पेटवत असतात.
त्यांच्या हातात मशाल नसते, त्यांच्या नावाभोवती प्रसिद्धीचे वलय नसते, त्यांच्या पाठीमागे घोषणांचा गजर नसतो. ते शांतपणे एखाद्या विद्यार्थ्याच्या मनात आत्मविश्वास जागवतात, एखाद्या सहकाऱ्याच्या क्षमतेला दिशा देतात, एखाद्या नवख्या कर्मचाऱ्याच्या भीतीवर ज्ञानाचा हात ठेवतात. त्यांचे कार्य दिसते कमी; पण त्याचे परिणाम दूरवर पसरत राहतात.
परंतु जगाचा एक विलक्षण स्वभाव आहे.
त्याला प्रकाशापेक्षा सावल्या जास्त आकर्षित करतात.
दिवा किती उजेड देतो यापेक्षा त्याच्या मागे किती अंधार आहे, हे शोधण्यात अनेकांना अधिक रस असतो. त्यामुळे ज्ञान वाटणाऱ्या व्यक्तीच्या कृतींपेक्षा त्याच्या हेतूंवर चर्चा जास्त होते. त्याने किती लोकांना घडवले यापेक्षा त्याला किती मान्यता मिळाली, याची मोजदाद सुरू होते.
मग प्रश्न उभे राहतात.
एखाद्या यादीत त्याचे नाव का?
एखाद्या छायाचित्रात तोच का?
एखाद्या व्यासपीठावर त्याला संधी का?
हे प्रश्न वरकरणी साधे वाटतात; पण त्यामागे अनेकदा वस्तुनिष्ठतेपेक्षा मनातील अदृश्य अस्वस्थता लपलेली असते.
कारण माणूस वास्तव जसे आहे तसे पाहत नाही; तो ते आपल्या मनाच्या चष्म्यातून पाहतो.
ज्याच्या मनात स्पर्धेची धग असते, त्याला प्रत्येक यशस्वी व्यक्ती प्रतिस्पर्धी वाटते.
ज्याच्या मनात असुरक्षितता असते, त्याला प्रत्येक निर्णय अन्याय वाटतो.
ज्याच्या मनात पूर्वग्रहांचे ढग असतात, त्याला प्रत्येक कृतीमागे गुप्त हेतू दिसू लागतो.
म्हणूनच अनेकदा सर्वाधिक गैरसमज त्या व्यक्तीबद्दल निर्माण होतात जी स्वतःपेक्षा इतरांना पुढे नेण्याचा प्रयत्न करत असते.
हीच तर खरी शोकांतिका आहे.
एखादा शिक्षक विद्यार्थ्यांना घडवत असतो, पण त्याच्यावर स्वतःचे गट निर्माण केल्याचा आरोप होतो.
एखादा अधिकारी ज्ञानाची देवाणघेवाण वाढवत असतो, पण त्याच्यावर प्रसिद्धीचा मोह असल्याची टीका होते.
एखादा समन्वयक लोकांना जोडत असतो, पण त्याला पक्षपाती ठरवले जाते.
माणसांच्या गर्दीत अनेकदा कृतींपेक्षा संशयाचा आवाज मोठा असतो.
पण काळाची न्यायव्यवस्था वेगळी असते.
तो कोण काय बोलले याचा फारसा हिशेब ठेवत नाही; तो कोण काय केले याची नोंद ठेवतो.
क्षणिक टाळ्यांचा गजर काळाच्या वाऱ्यात विरून जातो. कौतुकाच्या बातम्या जुन्या होतात. पुरस्कारांवरील धूळ वाढते. पदांची पाटी बदलते.
परंतु एखाद्या व्यक्तीने दुसऱ्याच्या आयुष्यात पेटवलेला ज्ञानाचा दिवा मात्र पुढे अनेक दिव्यांना जन्म देत राहतो.
खऱ्या अर्थाने कर्तृत्वाची परंपरा अशीच पुढे सरकते.
म्हणूनच जीवनाच्या संध्याकाळी माणसाला बाहेरच्या जगाने दिलेल्या प्रमाणपत्रांपेक्षा एकच गोष्ट अधिक महत्त्वाची वाटते—स्वतःच्या अंतर्मनाचा निर्णय.
स्वतःला आरशात पाहताना जर मन शांत असेल, तर बाहेरचे आरोप हळूहळू क्षीण होत जातात. कारण अंतर्मनाच्या न्यायालयात मिळालेली निर्दोष मुक्तता ही कोणत्याही सन्मानापेक्षा मोठी असते.
दिवा पेटवणाऱ्याने सावल्यांशी वाद घालू नये.
सावल्या प्रकाशाच्या अस्तित्वामुळेच निर्माण होतात. अंधाराला कधीच सावली नसते.
म्हणून जे लोक ज्ञानाची मशाल हातात घेऊन चालतात, त्यांनी संशयाच्या कुजबुजीकडे फारसे लक्ष देऊ नये. कारण त्यांचे खरे मूल्यमापन वर्तमान करत नसते; ते भविष्य करत असते.
आणि भविष्य नेहमी प्रकाशाचीच बाजू घेत असते.
दिवा पेटवत राहणाऱ्या प्रत्येक कर्मयोग्यासाठी कदाचित एकच संदेश पुरेसा आहे—
"प्रकाश देणे हेच आपले काम आहे.
कोणी उजेड घेईल,
कोणी सावली मोजेल,
आणि काळ...
तो शांतपणे सत्याची नोंद करत राहील."

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा