उत्सवाचा आवाज आणि आवाजाचा उत्सव... जल्लोषाच्या गर्दीत हरवलेलं एक छोटंसं ‘भान’
उत्सवाचा आवाज आणि आवाजाचा उत्सव
जल्लोषाच्या गर्दीत हरवलेलं एक छोटंसं ‘भान’
✍️ सुनिलदत्त कुलकर्णी, वाळूज
आपल्याला उत्सव आवडतात.
आणि ते आवडायलाच हवेत.
रस्ते उजळलेले, चौक सजलेले, तालावर थिरकणारी तरुणाई, नव्या कपड्यांत धावणारी मुलं, श्रद्धेने किंवा आनंदाने एकत्र आलेली माणसं, एकमेकांकडे पुढे होणारे आपुलकीचे हात—उत्सव म्हणजे आपल्या सामूहिक जगण्याला आलेली आनंदाची पालवी.
एरवी एकमेकांना ‘गुड मॉर्निंग’चा संदेश पाठवून आपापल्या कामात हरवलेली माणसं उत्सवात प्रत्यक्ष भेटतात. शेजारी शेजाऱ्याशी बोलतो. मित्र पुन्हा एकत्र येतात. पिढ्यांमधलं अंतर काही काळासाठी कमी होतं.
हे कमी महत्त्वाचं नाही.
पण अलीकडे एक प्रश्न पडतो—
आपण उत्सवाचा आवाज करतो आहोत, की आवाजाचाच उत्सव करतो आहोत?
फरक बारीक आहे.
पण महत्त्वाचा आहे.
ढोल वाजला पाहिजे.
ताशा कडाडला पाहिजे.
वाद्यांचे सूर उमटले पाहिजेत.
मिरवणूक निघाली पाहिजे.
पावलं थिरकली पाहिजेत.
कारण सार्वजनिक उत्सवाला सार्वजनिक अभिव्यक्ती असणारच.
ढोल-ताशा असो, पारंपरिक वाद्यवृंद असो, सामूहिक गायन असो किंवा अन्य सांस्कृतिक कलाविष्कार—त्यामागे कलाकारांचा सराव असतो, शिस्त असते, कौशल्य असतं, घाम असतो. एकाच लयीत पडणारे शेकडो हात आणि एकाच सुरात जुळणारी अनेक मनं हीसुद्धा कला आहे. तिला सरसकट ‘गोंगाट’ म्हणून मोडीत काढणं अन्यायाचं ठरेल.
कारण वाद्य आणि गोंगाट एकच नसतात; ताल आणि अनियंत्रित ध्वनी-अतिरेकही एकच नसतो.
पण म्हणून एक प्रश्न विचारायला काय हरकत आहे?
ताल किती मोठा झाला की त्याचं रूपांतर गोंगाटात होतं?
एका घरात मुलगा उद्याच्या परीक्षेची तयारी करतो आहे.
शेजारच्या घरात बाळ नुकतंच झोपलं आहे.
पलीकडचे आजोबा दवाखान्यातून परतले आहेत.
आणि रस्त्यावरून उत्सवी मिरवणूक जाते आहे.
मुलगा पुस्तकातून मान वर काढतो. खिडकीतून मिरवणूक पाहतो. तालावर त्याच्याही पायाने नकळत ठेका धरला.
इथपर्यंत उत्सव त्याचाही आहे.
थोड्या वेळाने आवाज इतका वाढतो की खिडकी बंद करूनही पुस्तकातलं वाक्य डोक्यात शिरत नाही. बाळ दचकून उठतं. आजोबांना अस्वस्थ वाटू लागतं.
मिरवणूक तीच.
उत्सव तोच.
माणसं तीच.
मग बदललं काय?
आनंदाने मर्यादा ओलांडली.
आपली गंमत अशी आहे की घरात मात्र आपण फार संवेदनशील असतो.
बाळ झोपलं की दूरचित्रवाणीचा आवाज कमी करतो. वडिलांची तब्येत बरी नसेल तर दार अलगद लावतो. मुलाची परीक्षा असेल तर पाहुण्यांनाही आवाज जरा कमी ठेवायला सांगतो.
पण घराबाहेर आलो की ही संवेदनशीलता चपला काढतो तशी दारातच काढून ठेवतो की काय, असा प्रश्न पडतो.
कारण बाहेरचा विद्यार्थी आपला मुलगा नसतो.
बाहेरचा वृद्ध आपले वडील नसतात.
बाहेरचं बाळ आपलं नसतं.
पण म्हणून त्यांची शांतताही आपली जबाबदारी नाही का?
आणि इथे एक गोष्ट अगदी स्पष्ट असायला हवी.
हा प्रश्न कोणत्याही एका धर्माचा, एका उत्सवाचा किंवा एका परंपरेचा नाही. धार्मिक मिरवणूक असो, प्रार्थना किंवा धार्मिक कार्यक्रम असो, जयंती असो, लग्नाची वरात असो, राजकीय सभा असो, विजयाचा जल्लोष असो, सांस्कृतिक कार्यक्रम असो किंवा खासगी समारंभ—आपला आनंद दुसऱ्याच्या शांततेवर अतिक्रमण करू लागला, की प्रश्न उत्सवाचा राहत नाही; तो आपल्या सामाजिक भानाचा होतो.
म्हणून उत्सवाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्याची गरज नाही.
रोजचे हॉर्न आहेत.
बांधकामाचा आवाज आहे.
लग्नसमारंभ आहेत.
वाहतुकीचा कोलाहल आहे.
राजकीय कार्यक्रम आहेत.
व्यावसायिक कार्यक्रम आहेत.
ध्वनिप्रदूषणाच्या न्यायालयात आरोपी एकटा उत्सव नाही.
पण त्यामुळे उत्सवाला निर्दोषत्वाचं प्रमाणपत्रही आपोआप मिळत नाही.
दुसरा नियम मोडतो म्हणून आपला नियमभंग संस्कृती ठरत नाही.
आणि दुसऱ्याचा गोंगाट आपल्या गोंगाटाला संगीत बनवत नाही.
खरं तर प्रश्न आवाजाचा कमी आणि वृत्तीचा अधिक आहे.
“मला आनंद साजरा करण्याचा अधिकार आहे.”
अगदी आहे.
पण त्यापुढे एक छोटंसं वाक्य जोडता आलं पाहिजे—
“आणि माझ्या आनंदामुळे दुसऱ्याला त्रास होणार नाही, याचं भान ठेवण्याची जबाबदारीही माझी आहे.”
अधिकार आणि जबाबदारी यांचं हे नातं आपण सोयीस्करपणे विसरतो.
अधिकार आपल्याला पटकन आठवतात.
जबाबदाऱ्या जरा उशिरा आठवतात.
कधी कधी पोलीस आल्यानंतर.
आपल्याला प्रत्येक गोष्टीसाठी नियम हवा असतो.
किती वाजेपर्यंत?
किती आवाज?
किती परवानगी?
कारवाई कोण करणार?
पण प्रत्येक माणसामागे पोलीस उभा करून सुसंस्कृत समाज तयार होत नसतो.
कायद्याने ध्वनिक्षेपक बंद करता येतो; संवेदनशीलता सुरू करता येत नाही.
ती आतून यावी लागते.
कारण हा केवळ कानाला त्रास होण्याचा प्रश्न नाही. तो सार्वजनिक आरोग्याचा, नागरिकांच्या शांततेच्या हक्काचा आणि आपल्या सामूहिक शिस्तीचाही प्रश्न आहे.
आणि गंमत म्हणजे ही संवेदनशीलता आपल्या संस्कृतींच्या मुळाशीच आहे.
कुठे प्रसाद वाटला जातो, कुठे लंगर असतो, कुठे अन्नदान, कुठे सेवा, कुठे दानधर्म, तर कुठे आनंदाच्या निमित्ताने गरजूंच्या मदतीसाठी हात पुढे केले जातात. नावं वेगवेगळी असतील; पण त्यामागची मानवी भावना एकच—
माझ्याकडचं चांगलं दुसऱ्याशी वाटून घेणं.
किती सुंदर कल्पना!
मग आनंद वाटताना—
त्रासही वाटायलाच हवा का?
उत्सव मोठा करायचा असेल तर मार्ग अनेक आहेत.
आवाज मोठा करण्याऐवजी आशय मोठा करता येतो.
मंडप मोठा आहे—मनही मोठं असू दे.
रोषणाई मोठी आहे—एखाद्याच्या शिक्षणातही थोडा प्रकाश पडू दे.
मिरवणूक भव्य आहे—तिच्यामागचा रस्ता स्वच्छ ठेवण्याची वृत्तीही भव्य असू दे.
तरुणांची संख्या हजारात आहे—त्यातले शंभर हात रक्तदानासाठी पुढे आले, काही हात वृक्षारोपणासाठी सरसावले, काही गरजूंच्या मदतीला गेले, तर उत्सवाचा आवाज दुसऱ्या दिवशी थांबेल; त्याचा अर्थ मात्र दीर्घकाळ टिकेल.
उत्सवाची उंची ध्वनिक्षेपकाच्या उंचीवर ठरत नाही.
ती उत्सवानंतर समाजाच्या हाती काय उरतं, यावर ठरते.
मला ढोल बंद झालेले रस्ते नकोत.
मला उत्सवविरहित शहरही नको.
मला चौकातली तरुणाई मोबाईलमध्ये डोकं घालून शांत बसलेली पाहण्यापेक्षा तालावर आनंदाने नाचताना पाहायला अधिक आवडेल.
पण तिच्या त्या आनंदात समाजभानाची एक छोटीशी जागा असावी.
इतकीच अपेक्षा.
ढोल वाजू दे.
पण हृदयाची धडधडही ऐकू येऊ दे.
मिरवणूक निघू दे.
पण तिच्या मार्गावरच्या माणसांचं अस्तित्व विसरू नको.
श्रद्धा व्यक्त होऊ दे.
आनंद ओसंडू दे.
जल्लोषही होऊ दे.
पण आपल्या आनंदाच्या कक्षा दुसऱ्याच्या जगण्यावर आक्रमण करू नयेत, एवढं भान राहू दे.
उत्सव संपल्यानंतर लोकांनी—
“वा! काय उत्सव होता!”
असं म्हणावं.
“हुश्श! एकदाचा संपला!”
असं नाही.
या दोन उद्गारांमधलं अंतरच कदाचित उत्सव आणि गोंगाट यांच्यातलं अंतर आहे.
शेवटी एक साधी गोष्ट.
आपला आवाज आपल्या मालकीचा आहे.
पण तो जिथपर्यंत पोहोचतो, तिथली शांतता फक्त आपल्या मालकीची नाही.
हे समजण्यासाठी ध्वनिमापक यंत्र लागत नाही.
थोडी संवेदना पुरते.
म्हणून उत्सव हवा.
दमदार हवा.
रंगीबेरंगी हवा.
वाद्यांच्या तालासह हवा.
तरुणाईच्या जल्लोषासह हवा.
श्रद्धा, परंपरा, संस्कृती, मैत्री आणि माणुसकीच्या आनंदासह हवा.
पण आनंदाच्या एका हातात उत्साह असेल, तर दुसऱ्या हातात भानही असू दे.
कारण—
उत्सवाचा आवाज सुंदर असतो;
पण आवाजाचाच उत्सव सुरू झाला,
की संगीत कुठेतरी हरवून जातं.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा