विसर्जन
विसर्जन
(विसर्जन म्हणजे नष्ट करणं नाही.
पाण्यात उतरलेली माती नष्ट होत नाही.
फक्त तिचा आकार विरघळतो.
कालपर्यंत तिला डोळे होते, हात होते, मुकुट होता, एक ओळख होती.
आज ती पुन्हा माती होते.
निसर्गाला बहुधा “संपलं” हा शब्द माहीत नसावा.
त्याला रूप बदलणं माहीत असतं.)
✍️ सुनिलदत्त कुलकर्णी, वाळूज
संध्याकाळ नदीच्या पाण्यावर उतरू लागली होती.
रस्त्यावर अजूनही गुलाल होता. दूरवर ढोलांचा आवाज घुमत होता. गर्दीतून गणपतीची मूर्ती हळूहळू घाटाकडे सरकत होती.
कुणी नाचत होतं.
कुणी घोषणा देत होतं.
कुणी मोबाईलमध्ये शेवटचे क्षण साठवत होतं.
आणि मी गर्दीच्या थोडा मागे, शांतपणे चालत होतो.
दहा दिवस घरात मुक्कामाला आलेला देव आज निरोप घेत होता.
ज्याच्यासाठी मखर सजवलं, फुलं आणली, आरत्या म्हटल्या, नैवेद्य ठेवला; ज्याच्या येण्याने घरात प्रसन्नता भरली—त्यालाच आज आपल्या हातांनी उचलून नदीपर्यंत न्यायचं होतं.
सोडून द्यायचं होतं.
केवढा विलक्षण विधी!
आयुष्य आपल्याला जपायला शिकवतं. माणसं जपायची, नाती जपायची, आठवणी जपायच्या.
पण काहीतरी मनापासून जपल्यानंतरही एक दिवस ते हातातून सोडावं लागतं, हा संस्कार बहुधा विसर्जन शिकवत असावं.
मूर्ती पुढे सरकत होती आणि माझ्या मनात अचानक एक विचित्र विचार आला—
मनात साचलेल्या गोष्टींसाठीही असा एखादा घाट असता तर?
वर्षानुवर्षे आत ठेवलेल्या गोष्टी एखाद्या दिवशी बाहेर काढता आल्या असत्या.
एखादी आठवण.
अर्धवट राहिलेला संवाद.
न विचारलेला प्रश्न.
न मिळालेलं उत्तर.
एखादं नाव.
एखादा चेहरा.
एखादा क्षण—
ज्याला आपण विसरलो आहोत, असं स्वतःलाच कित्येकदा सांगितलेलं असतं.
ते खांद्यावर घेऊन नदीकाठी यायचं आणि पाण्याला एवढंच म्हणायचं—
“हे घे. इतके दिवस मी सांभाळलं. आता मला जमत नाही.”
आठवणींच्या विसर्जनासाठी पंचांगात मुहूर्त नसतो.
आणि काही वेदना सोडून देण्याची तारीख कॅलेंडरवर आपोआप येत नाही.
ती आपल्यालाच ठरवावी लागते.
आयुष्य मात्र आपल्या मनाची वाट पाहत नाही.
मनात काहीही सुरू असलं तरी सकाळ वेळेवर होते. गजर वाजतो. चहा उकळतो. फोन येतात. ऑफिस सुरू होतं. फाईली सरकतात. मीटिंग होतात. माणसं भेटतात.
कधी मनापासूनही हसतो.
संध्याकाळी घरी परततो. दिवे लागतात. जेवण होतं. रात्र होते.
जगाच्या दृष्टीने सगळं सुरळीत चाललेलं असतं.
फक्त आपल्या आत कुठेतरी एक घड्याळ थांबलेलं असतं.
त्याचे काटे एका ठरावीक क्षणावर अडकलेले.
बाहेरची वर्षं पुढे जातात; आतली वेळ मात्र तिथेच उभी असते.
आणि मग एखाद्या साध्याशा दिवशी जुनं गाणं कानावर पडतं. एखादा फोटो दिसतो. गाडी जुन्या रस्त्यावरून जाते. कुणीतरी सहज एखादं नाव उच्चारतं.
बस्स.
तेव्हा कळतं—
काही गोष्टी आपण विसरलेल्या नसतात.
त्या फक्त शांत झालेल्या असतात.
नदीच्या तळाशी बसलेल्या गाळासारख्या.
पाणी स्वच्छ दिसतं म्हणून गाळ नाहीसा झालेला नसतो.
फक्त बरेच दिवस कुणी तळ ढवळलेला नसतो.
मूर्ती हळूहळू पाण्यात उतरू लागली.
आधी पाय.
मग कंबर.
मग खांदे.
क्षणभर फक्त गणपतीचा प्रसन्न चेहरा पाण्यावर दिसत राहिला.
जयघोष अधिक मोठा झाला.
आणि पुढच्या क्षणी तो चेहराही पाण्याखाली गेला.
पाण्यावर काही वर्तुळं उमटली. थोडा गुलाल तरंगला. हारातून सुटलेलं एक फूल प्रवाहाबरोबर पुढे निघून गेलं.
काही क्षणांत जिथे एक मूर्ती होती, तिथे पुन्हा फक्त पाणी उरलं.
मी त्या पाण्याकडे पाहत राहिलो.
एक गोष्ट मनाला विलक्षण स्पर्शून गेली—
इतके दिवस जपलेला देव पाण्यात गेला; पण कुणी त्याला परत आणायला धावलं नाही.
कुणी म्हणालं नाही,
“थांबा... अजून थोडा वेळ.”
कारण प्रत्येकाला माहीत होतं—
वेळ झाली आहे.
सोडून देण्याची वेळ झाली आहे, हे स्वीकारणं असतं.
कधी एखादं दार ठोठावणं थांबवायचं असतं.
कधी उत्तराची वाट पाहणं.
कधी “असं का झालं?” हा प्रश्न स्वतःलाच पुन्हा पुन्हा विचारणं.
आणि कधी एखाद्या गोष्टीला समाधानकारक शेवट मिळाला नसला, तरी तिच्यामागे चालत राहणं थांबवायचं असतं.
कारण प्रत्येक प्रवासाचा शेवट स्टेशनवर होत नाही.
कधी आपण मध्येच उतरतो.
गाडी पुढे निघून जाते.
आपण काही काळ फलाटावर उभे राहतो.
आणि एक दिवस उमगतं—
ती गाडी शेवटी कुठे पोहोचली, हे जाणून घेणं आता आपल्या प्रवासाचा भाग उरलेलं नाही.
माणसाला प्रत्येक गोष्टीचा नीट शेवट हवा असतो.
शेवटचं बोलणं.
शेवटची भेट.
एक स्पष्ट उत्तर.
एक समाधानकारक कारण.
एक व्यवस्थित निरोप.
पण आयुष्य तसं नसतं.
काही माणसं मधल्या पानावरून निघून जातात.
काही वाक्यं अर्ध्यावर थांबतात.
काही प्रश्नांच्या वाट्याला उत्तराऐवजी शांतता येते.
आणि काही कथांना शेवटचं पानच मिळत नाही.
मग एक दिवस आपल्यालाच पुस्तक बंद करावं लागतं.
कथा पूर्ण झाली म्हणून नाही.
एका अपूर्ण पानापाशी संपूर्ण आयुष्य थांबवता येत नाही म्हणून.
कदाचित तेही एक विसर्जनच असावं.
पाण्यात उतरलेली माती नष्ट होत नाही.
फक्त तिचा आकार विरघळतो.
कालपर्यंत तिला डोळे होते, हात होते, मुकुट होता, एक ओळख होती.
आज ती पुन्हा माती होते.
त्याला रूप बदलणं माहीत असतं.
आठवणींचंही तसंच असावं.
त्यांना पुसता येत नाही.
पण आपल्या आत त्यांनी व्यापलेली जागा बदलता येते.
कधीकाळी जी आठवण संपूर्ण दिवस व्यापून टाकायची, ती पुढे एखाद्या क्षणापुरती उरू शकते.
ज्या घटनेने कित्येक रात्रींची झोप हिरावून घेतली, ती कधीतरी एका शांत उसास्यात मावू शकते.
घटना बदलत नाही.
भूतकाळही बदलत नाही.
बदलतो तो फक्त—
आपल्या वर्तमानावर असलेला त्याचा हक्क.
एव्हाना गर्दी परत फिरू लागली होती.
ढोलांचा आवाज दूर जात होता. रस्त्यावरचा गुलाल पावलांखाली मिसळत होता. कुणीतरी प्रसाद वाटत होतं. मुलांच्या घोषणा अजूनही सुरू होत्या.
जणू काही घडलंच नव्हतं.
मी बराच वेळ पाण्याकडे पाहत राहिलो.
का, माहीत नाही.
कदाचित पाण्याखाली गेलेल्या मूर्तीकडे पाहत नव्हतोच मी.
काही गोष्टींची गंमत असते.
त्या आपल्या आयुष्यातून निघून गेल्यानंतरही आपण त्यांच्यासाठी मनात एक जागा तशीच राखून ठेवतो. कधीतरी त्या परत येतील म्हणून नव्हे; ती जागा रिकामी आहे, हे स्वीकारणं कठीण जातं म्हणून.
मग आपण त्या जागेभोवतीच जगायला शिकतो.
हसतो.
काम करतो.
लोकांत मिसळतो.
पुढेही जातो.
त्यावर नाव नसतं.
आणि तरीही आपल्याला माहीत असतं—
ते दार कुणाचं आहे.
त्या संध्याकाळी नदीकाठी उभा असताना पहिल्यांदा वाटलं—
दार बंद असणं आणि आयुष्य बंद असणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत.
काही दारं उघडली नाहीत तरी चालतं.
त्यांच्यासमोर आयुष्यभर उभं राहण्याची गरज नसते.
मी घाटाच्या पायऱ्या चढू लागलो.
मागून जयघोष आला—
“गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या...”
मी थांबलो.
त्या चार शब्दांनी मनात कुठेतरी हलकासा धक्का दिला—
पुढच्या वर्षी लवकर या.
किती सहज म्हणतो आपण!
कारण काही जाण्यांमध्ये परत येण्याचं आश्वासन असतं.
आणि काही जाण्यांमध्ये...
मी पुढचा विचार केला नाही.
पायऱ्या चढत राहिलो.
शेवटच्या पायरीवर आलो तेव्हा नकळत मागे वळावंसं वाटलं.
वळलो नाही.
समोर घरी जाणारा नेहमीचाच रस्ता होता.
तोच रस्ता.
तीच रात्र.
तोच मी.
तरीही काहीतरी वेगळं होतं.
क्षणभर हातांकडे पाहिलं.
रिकामे होते.
घाटावर येतानाही रिकामेच होते.
मग फरक कुठे होता?
उत्तर शोधलं नाही.
काही उत्तरं फार उशिरा मिळाली की त्यांचा उपयोग उरत नाही.
मी चालू लागलो.
मागून पुन्हा आवाज आला—
“पुढच्या वर्षी लवकर या...”
यावेळी ओठांवर हलकंसं हसू आलं.
मनातल्या मनात बाप्पाला म्हटलं—
“नक्की या.”
आणि पुढे चालत राहिलो.
काही अंतर गेल्यावर एकदा वाटलं—
आज घाटावरून निघताना काहीतरी राहून गेलं आहे.
सगळं होतं.
मोबाईल.
किल्ल्या.
पाकीट.
मग पुन्हा चालू लागलो.
थोडं पुढे गेल्यावर लक्षात आलं—
जे राहून गेलं होतं,
ते खिशातलं नव्हतंच.
आणि अनेक दिवसांनी पहिल्यांदा,
ते परत आणण्यासाठी
मागे वळावंसं वाटलं नाही.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा