यशात वाटेकरी… कामात खांदेकरी!

यशात वाटेकरी… कामात खांदेकरी!

✍️ सुनिलदत्त कुलकर्णी, वाळूज

समारंभ संपला होता.

टाळ्यांचा आवाज अजून सभागृहात रेंगाळत होता. मंचावरील दिवे उजळलेले होते. पुष्पगुच्छांच्या रंगांत आणि छायाचित्रांसाठी जमलेल्या चेहऱ्यांत यशाचा आनंद ओसंडत होता.

“हे आपल्या सर्वांचे यश आहे!”

वाक्य उच्चारले गेले आणि पुन्हा टाळ्या वाजल्या.

खरेच, यश सर्वांचे असावे. आनंदाला कुंपण कशासाठी? एखाद्या कामातून चांगले घडले, तर त्याचा अभिमान प्रत्येकाला वाटावा.

पण छायाचित्रात सगळ्यांना सामावून घेण्यासाठी थोडे मागे सरकताना, एका माणसाच्या मनात प्रश्न आला—

आज माझ्याशेजारी उभे असलेले हे खांदे, कामाच्या वेळी कुठे होते?

त्याने प्रश्न बोलून दाखवला नाही. चेहऱ्यावरचे हसू कायम ठेवले. कॅमेरा चमकला. सर्वांचे यश एका चौकटीत बंद झाले.

त्या चौकटीबाहेर मात्र अनेक दिवसांचा प्रवास होता.

उत्तर न मिळालेले फोन होते. पुन्हा पुन्हा केलेला पाठपुरावा होता. शेवटच्या क्षणी बदललेले नियोजन होते. मिटलेली अडचण आणि लगेच उभी राहिलेली दुसरी अडचण होती.

कधी दुपारचे जेवण संध्याकाळी झाले होते. कधी घरी पोहोचल्यानंतरही कार्यालयाचा दिवस संपला नव्हता. घरातून “आता तरी काम ठेवता का?” असा प्रश्न आला होता. त्यावर “फक्त हे एक पूर्ण करतो,” असे उत्तर दिले गेले होते.

ते ‘एक’ पूर्ण होईपर्यंत आणखी तीन कामे समोर आली होती.

यशाच्या छायाचित्रात हे काही दिसत नाही.

त्यात फक्त पूर्ण झालेला कार्यक्रम दिसतो. थकवा दिसत नाही. वेळेवर सादर झालेला अहवाल दिसतो. त्यासाठी जागलेली रात्र दिसत नाही. नीटनेटकी व्यवस्था दिसते. ती जुळवताना झालेली धावपळ दिसत नाही.

आणि म्हणूनच यशाच्या क्षणी उच्चारलेले “आपण” हे शब्द कधी कधी मनाला सुखावतात, तर कधी आत कुठेतरी टोचतात.

कारण कामाच्या दिवसांत वारंवार ऐकू आलेले शब्द वेगळे असतात—

“तुम्ही बघा.”

“तुम्ही जमवून घ्याल.”

“तुम्हाला अनुभव आहे.”

“काही अडचण आली तर कळवा.”

अडचण कळवली जाते. ती ऐकलीही जाते. पण काम पुन्हा त्याच हातात राहते.

हळूहळू त्या माणसाला मदत मागण्यापेक्षा काम करून टाकणे सोपे वाटू लागते. समजावण्याचा वेळ वाचतो. पाठपुराव्याचा त्रास टळतो. मुदत पाळली जाते.

मग त्याच्या कार्यक्षमतेची कीर्ती वाढते.

“त्याच्याकडे दिले की काम होते!”

या कौतुकासोबत त्याच्याकडे आणखी काम येते. तो निभावून नेतो. पुन्हा कौतुक होते. पुन्हा भार वाढतो.

एका दिवसात हे घडत नाही. ओझे थोडे थोडे ठेवले जाते. म्हणून ठेवणाऱ्याला ते हलके वाटते. उचलणाऱ्याला मात्र सगळ्याचे मिळून वजन जाणवत असते.

त्याच्या मनात यशाचा वाटा कमी मिळाल्याची खंत असेलच असे नाही.

कामाचा भार वाटून घेणारे हात कमी मिळाल्याची वेदना अधिक खोल असते.

आपल्या अंगणात एखादे मोठे कार्य असते, तेव्हा हे सहज समजते. पाहुणे आले की सर्व जण स्वागतासाठी पुढे येतात. पण त्याआधी मंडप उभारणे, सामान आणणे, पाणी भरणे, बैठक लावणे—या कामांत जो हात लावतो, त्याची जवळीक वेगळी जाणवते.

तो किती वेळ कामाला होता, याचे हिशेब मन ठेवत नाही. त्याने ऐन वेळी दिलेला आधार मात्र लक्षात राहतो.

“तू ते पाहा; हे मी सांभाळतो.”

एवढ्या वाक्यानेही दमलेल्या माणसाच्या अंगात पुन्हा बळ येऊ शकते.

खांदेकरी होणे म्हणजे प्रत्येकाला सारखाच भार उचलावा लागणे नव्हे. कुणाकडे अनुभव असतो. कुणाकडे वेळ असतो. कुणाकडे अधिकार असतात. कुणाकडे एखादे विशिष्ट कौशल्य असते.

ज्याच्याकडे जे आहे, ते कामाच्या वेळी पुढे आले, तर भार हलका होतो.

निर्णय घेऊ शकणाऱ्याने निर्णय घ्यावा. माहिती देऊ शकणाऱ्याने ती वेळेत द्यावी. समन्वय करणाऱ्याने अपूर्ण संपर्क पूर्ण करावा. एखादे काम स्वीकारले, तर ते शेवटपर्यंत सांभाळावे.

अशा छोट्या कृतींमधून ‘आपले काम’ आकार घेते.

यशाच्या मंचावर एकत्र उभे राहण्याआधी, कामाच्या वाटेवर एकत्र चालणे घडते.

त्या वाटेवर नेहमी टाळ्या नसतात. कधी चिडचिड असते. गोंधळ असतो. चुका असतात. वेळ कमी असतो. अशा वेळी सोबत टिकवणे जरा कठीण असते.

पण सोबतीची खरी ओळखही तिथेच होते.

समारंभातील पुष्पगुच्छ सुंदर असतो. त्याचा सुगंध काही काळ राहतो. कामाच्या गर्दीत कुणीतरी हातातून घेतलेली फाइल, वेळेत केलेला फोन किंवा स्वतःहून सोडवलेली अडचण—यांचा दिलासा अधिक काळ मनात राहतो.

कारण त्या कृतीने माणसाला एक गोष्ट जाणवते—

मी एकटा नाही.

काम करणाऱ्या माणसाला हे जाणवणे किती आवश्यक आहे! प्रत्येक वेळी त्याला प्रेरणेचे भाषण हवे नसते. त्याच्या क्षमतेची आठवणही करून द्यावी लागत नाही. कधी त्याला फक्त समोरच्या खुर्चीतून कुणीतरी उठावे, एवढीच अपेक्षा असते.

आणि म्हणावे—

“चल, थोडं काम माझ्याकडे दे.”

असे हात पुढे आले, तर यशाचा आनंदही बदलतो. “हे आपल्या सर्वांचे यश आहे,” हे वाक्य ऐकताना मनात प्रश्न उरत नाही. त्या वाक्याला प्रत्येकाच्या श्रमांचा आधार असतो.

मग छायाचित्रासाठी खांद्याला खांदा लावून उभे राहणे सहज वाटते.

कारण ते खांदे आधी ओझ्याखालीही एकत्र आलेले असतात.

समारंभ संपल्यानंतर सभागृह रिकामे झाले. काही खुर्च्या जागेवर ठेवायच्या होत्या. काही साहित्य आवरायचे होते. काम करणारा तो माणूस पुन्हा पुढे झाला.

यावेळी त्याच्या शेजारी दुसरा माणूस आला. त्याने काहीही भाषण केले नाही. दोन खुर्च्या उचलल्या.

पहिल्या माणसाने त्याच्याकडे पाहिले.

दिवसभरात प्रथमच त्याच्या चेहऱ्यावरचे हसू छायाचित्रासाठी नव्हते.

यशात जसे वाटेकरी होता, तसे कामातही खांदेकरी व्हा.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अविनाश निंबाळकर : साधेपणातून घडलेला अर्थपूर्ण जीवनप्रवास

दामिनी : आतल्या आकाशात चमकलेली वीज

🎖️ गौरव पत्र 🎖️ईएचव्ही यंत्रणांच्या वतीने मा. संचालक (प्रकल्प) श्री. अविनाश निंबाळकर साहेब यांना