मीटिंग की (M) eating?
मीटिंग की (M) eating?
✍️ सुनिलदत्त कुलकर्णी, वाळूज
बैठकीची सूचना आली की पूर्वी लोक विचारायचे, “विषय काय आहे?” आता विचारतात, “जेवणाची व्यवस्था काय आहे?”
या एका प्रश्नात आपल्या बैठकींच्या उत्क्रांतीचा बराच मोठा इतिहास सामावलेला आहे. विषय कितीही गंभीर असो, व्यवस्था चोख हवी. प्रश्न प्रलंबित राहिला तरी चालेल; पण नाश्ता प्रलंबित राहता कामा नये!
परवा एका बैठकीच्या तयारीची लगबग सुरू होती. फाईली तयार होत्या. सादरीकरण तयार होते. मागच्या बैठकीत न सुटलेले प्रश्नही नव्या बैठकीत सहभागी होण्यासाठी सज्ज होते. इतक्यात फोन वाजला.
“उद्याच्या बैठकीचं सगळं ठरलं ना?”
“हो. विषयपत्रिका पाठवली आहे.”
“ते ठीक आहे. सकाळी नाश्त्याला काय ठरवलं?”
संयोजकाने विषयपत्रिका हळूच बाजूला ठेवली. बैठकीच्या खऱ्या तयारीला आता सुरुवात झाली होती.
“पोहे आणि चहा ठेवू म्हणतोय.”
पलीकडे क्षणभर शांतता पसरली. जणू संयोजकाने संस्थेच्या भवितव्यावरच घाला घातला होता.
“नुसते पोहे? काहीतरी गरम पाहिजे.”
पोहे गरमच असणार होते; पण ‘गरम’ हा इथे तापमानाचा विषय नव्हता. तो प्रतिष्ठेचा विषय होता. शेवटी वडा-सांबार ठरले. त्यावर कुणीतरी इडली सुचवली. आणखी एकाने शिरा असावा, असे मत नोंदवले. मूळ बैठकीपूर्वीच नाश्त्यावरची उपसमिती कार्यरत झाली.
विशेष म्हणजे या चर्चेत कुणीही गप्प नव्हते.
प्रत्यक्ष बैठक सुरू झाली तेव्हा टेबलावर पाण्याच्या बाटल्या, समोर फाईली आणि चेहऱ्यांवर गांभीर्य होते. अध्यक्षांनी विषयपत्रिका उघडली.
“मागील बैठकीतील निर्णयांच्या अंमलबजावणीचा आढावा घेऊ.”
सगळ्यांनी आपापल्या फाईलींत पाहायला सुरुवात केली. काहींनी इतक्या खोलवर पाहिले की त्यांना पुन्हा वर येण्यासाठी चहाची वाट पाहावी लागली.
पहिल्या विषयावर माहिती अपुरी होती. दुसऱ्यावर संबंधितांचा अभिप्राय यायचा होता. तिसरा विषय वरिष्ठांच्या मार्गदर्शनासाठी ठेवायचा होता. चौथ्या विषयासाठी स्वतंत्र बैठक आवश्यक होती.
कामकाज व्यवस्थित पुढे चालले होते—पुढच्या बैठकीकडे.
तेवढ्यात दार उघडले. चहाचा ट्रे आत आला.
क्षणात वातावरण बदलले. आतापर्यंत अस्पष्ट असलेली मते स्पष्ट झाली.
“मला साखर नको.”
“माझा जरा कडक.”
“चहा नको, कॉफी मिळेल?”
“बिस्किटं खारी आहेत का?”
आपल्या गरजा इतक्या नेमक्या शब्दांत मांडता येणारी माणसे कामाच्या विषयावर “बघू”, “करू”, “ठरवू” एवढ्याच शब्दांत का बोलतात, याचा मला क्षणभर प्रश्न पडला. पण माझ्यासमोरही चहा आला आणि माझे चिंतन तात्पुरते तहकूब झाले.
बैठकीत सर्वाधिक एकमत कशावर होते, तर जेवणाची वेळ झाली यावर.
घड्याळाकडे पाहून एक सदस्य म्हणतात, “आता उरलेले मुद्दे जेवणानंतर घेऊ.”
हा प्रस्ताव कुणी लिहून आणलेला नसतो. त्याला अनुमोदक शोधावा लागत नाही. मतदानाची गरज पडत नाही. सर्वांच्या चेहऱ्यांवर उमटलेले समाधान हाच त्याच्या मंजुरीचा अधिकृत पुरावा असतो.
जेवणाच्या टेबलावर मात्र चर्चा विलक्षण मुद्देसूद होते.
भाजीमध्ये मीठ कमी आहे, आमटी थोडी गोड झाली आहे, पोळी गरम हवी होती, मागच्या वेळी गुलाबजाम चांगले होते—प्रत्येक निरीक्षण नेमके, प्रत्येक अभिप्राय स्पष्ट आणि सुधारणा तातडीने अपेक्षित!
“भाजी थंड आहे,” असे सांगितल्यावर कुणी “याबाबत पुढील बैठकीत विचार करू,” म्हणत नाही. लगेच गरम भाजी येते.
कामाच्या प्रश्नांनाही अशीच वाढपाची व्यवस्था असती, तर किती बरे झाले असते!
“हा प्रश्न तीन महिन्यांपासून पडून आहे.”
“अरे, यांना एक ताजा निर्णय वाढा!”
पण निर्णयांची कढई बहुधा वेगळ्याच स्वयंपाकघरात असावी. तिथला आचारी नेहमी रजेवर असतो.
जेवणानंतरची बैठक हा स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे.
पहिल्या सत्रात मन भोजनाकडे धावत असते. दुसऱ्या सत्रात शरीर भोजन पचवण्याच्या राष्ट्रीय कार्यात गुंतलेले असते. सादरीकरणातील आकडे पडद्यावर चढत असतात आणि पापण्या खाली उतरत असतात.
एखादा उत्साही अधिकारी प्रश्न मांडत राहतो. समोरून मानाही हलत राहतात. त्या अनुमोदनासाठी हलत आहेत की निद्रेच्या सीमेवर तोल सावरण्यासाठी, हे इतिवृत्त लिहिणाऱ्याच्या अनुभवावर अवलंबून असते.
अशा वेळी सर्वांना दिलासा देणारे वाक्य ऐकू येते—
“या विषयावर सविस्तर चर्चा करण्यासाठी स्वतंत्र बैठक घेऊ.”
सर्वजण जागे होतात. प्रस्ताव मंजूर होतो.
प्रश्नाला आणखी एक तारीख मिळते. बैठकीला आणखी एक संधी.
नंतर इतिवृत्त तयार होते.
“सदर विषयावर सविस्तर चर्चा झाली.”
किती सुंदर वाक्य आहे! चर्चा किती झाली, कुठे पोहोचली आणि तिच्यातून काय निघाले, यांपैकी काहीही सांगण्याची सक्ती नाही.
“योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या.”
योग्य कोणती, करणार कोण आणि केव्हा—हे प्रश्न त्या वाक्याच्या बाहेर नम्रपणे उभे राहतात.
मात्र भोजनाचे देयक पाहा. किती माणसे, किती ताटे, किती कप, दर किती, एकूण किती—सगळे स्वच्छ!
बैठकीत नेमके काय निष्पन्न झाले, याचा शोध घ्यावा लागतो; किती समोसे संपले, याची नोंद मात्र बिनचूक मिळते.
पाहुणचार असावा. दूरवरून आलेल्या माणसाला चहा-पाणी, जेवण मिळावेच. पण कधी कधी तयारी पाहताना वाटते, प्रश्न सोडवण्यासाठी माणसे बोलावली आहेत की माणसे जेवायला जमावीत म्हणून प्रश्न राखून ठेवले आहेत?
नाश्त्याचा पदार्थ बदलण्यासाठी चार फोन होतात. प्रलंबित कामासाठी केलेला पाचवा फोन मात्र उचलला जात नाही. ताटात काय कमी आहे, ते लगेच दिसते; कामात काय राहिले आहे, त्यासाठी पुढचा आढावा लागतो.
आणि मग सहज चार ओळी मनात येतात—
चर्चेपेक्षा खाण्यालाच
आजकाल बैठकीत महत्त्व आहे;
निर्णय कमी, वेळकाढूपणा जास्त—
हेच आजकालचं खरं तत्त्व आहे!
बैठक संपते. खुर्च्या रिकाम्या होतात. उरलेली भांडी आवरली जातात. फाईली पुन्हा कपाटात जातात. प्रश्नही आपापल्या फाईलींत निमूट बसतात. त्यांना आता या येण्या-जाण्याची सवय झालेली असते.
दाराशी निरोप घेताना एक जण संयोजकाला म्हणतो, “बैठक छान झाली!”
संयोजकाच्या चेहऱ्यावर समाधान पसरते.
“जेवण तर अप्रतिम होतं. पुढच्या वेळीही हाच आचारी ठेवा.”
मी विषयपत्रिका उचलतो. पहिल्या पानावर आमटीचा एक थेंब पडलेला असतो.
आजच्या बैठकीत कागदावर ठोस उमटलेली तीच एक गोष्ट असते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा